ट्रॅक्टरची चोरी करणारी टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:12 AM2021-05-26T04:12:16+5:302021-05-26T04:12:16+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शिरूर, पारनेर, जुन्नर तालुक्यांतील शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर चोरणाऱ्या टोळीचा ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला असून, चौघांना ...

Tractor theft gang arrested | ट्रॅक्टरची चोरी करणारी टोळी जेरबंद

ट्रॅक्टरची चोरी करणारी टोळी जेरबंद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : शिरूर, पारनेर, जुन्नर तालुक्यांतील शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर चोरणाऱ्या टोळीचा ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला असून, चौघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून १० ट्रॅक्टर, ४ जीप, ६ मोटारसायकल, ६ जनावरे जप्त केली असून बँक, पतसंस्था, एटीएम फोडण्याचा प्रयत्न केल्याचे ३ गुन्ह्यांसह एकूण २१ गुन्हे उघडकीस आणले आहेत.

सतीश अशोक राक्षे (रा. बेलवंडी फाटा, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर, सध्या रा. शिरूर), ज्ञानदेव ऊर्फ माऊली विनायक नाचबोणे (रा. शिरूर, मूळ औसा, जि. लातूर), प्रवीण कैलास कोरडे (मूळ रा. बोरी, ता. जुन्नर, सध्या रा. शिरूर) आणि सुनील ऊर्फ भाऊ बिभिषण देवकाते (रा. इस्ले, ता. बार्शी, जि. सोलापूर, सध्या शिरूर) अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत.

त्यांच्याकडून ७६ लाख ८८ हजार रुपयांचे १० ट्रॅक्टर, २ पिकअप, २ जीप, ६ मोटारसायकल, ऑक्सिजन सिलिंडर, घरगुती गॅस सिलिंडर, गॅस कटर, ५ गायी, नटबोल्ट खोलावयाचे पाने असा माल जप्त केला आहे.

याबाबत पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी माहिती दिली. शिरूर, पारनेर, जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर चोरीचे बरेच गुन्हे या वर्षभरात घडले होते. त्यादृ्ष्टीने तपास करण्याचा आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिले होते. शिरूर शहरात आरोपी हे एकत्र फिरतात. ते कोणताही काम धंदा करत नाहीत. ते वेगवेगळ्या ट्रॅक्टर, पिकअप अशा गाड्या आणतात अशी माहिती मिळाली. त्यावरुन पोलिसांनी चौघांनाही ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यात त्यांनी ट्रॅक्टर चोरल्याचे निष्पन्न झाले.

त्यांच्याकडून शिरूर, आळेफाटा, नारायणराव, खेड, यवत, मंचर येथील १२ गुन्हे, अहमदनगर जिल्ह्यातील बेलवंडी, पारनेर येथील ८ गुन्हे, तर बार्शी येथील १ गुन्हा उघडकीस आला आहे.

असे चोरायचे ट्रॅक्टर

सतीश राक्षे याने जीप विकत घेतली होती़ त्याचे कर्ज थकल्याने फायनान्स कंपनीच्या लोकांनी दोन -तीनदा जीप जप्त करू असे त्याला सांगितले होते. हे कर्ज फेडण्यासाठी त्याचा नातेवाईक प्रवीण कोरडे याच्याबरोबर मिळून त्याने कट रचला. त्यासाठी इतर दोघांना बरोबर घेतले. सतीश राक्षे हा रेकी करायचा आणि पुणे-नगर सीमेवरील गावात घराबाहेर लावलेला ट्रॅक्टर ते रात्री १२ च्या सुमारास चोरत. रात्रभर तसाच चालवत ते ट्रॅक्टर दुसऱ्या जिल्ह्यात नेत. हे सर्व जण डायव्हर म्हणून काम करीत असल्याने त्यांना कोणतेही वाहन चालवता येते. सुनील देवकाते हा गिऱ्हाईक शोधत असे. त्यांना कर्ज थकल्याने फायनान्स कंपनीने जप्त केलेले हे ट्रॅक्टर आहेत. तुम्हाला कमी किमतीत देतो. सध्या लॉकडाऊन असल्याने कागदपत्रे नंतर मिळतील, असे सांगत व त्यांच्याकडून निम्मी रक्कम घेत असत.

अशाच प्रकारे त्यांनी पिकअप, जीप चोरून त्यातून ते रस्त्याकडील दुभत्या गायी चोरून नेल्या होत्या. या चोऱ्या पचल्यानंतर त्यांनी पारनेर येथे पतसंस्था, एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला होता.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पदमाकर घनवट, सहायक पोलीस निरीक्षक सचिन काळे, सहायक फौजदार दत्तात्रय गिरमकर, उमाकांत कुंजीर, जनार्दन शेळके, सचिन गायकवाड, दत्तात्रय तांबे, दीपक साबळे, राजू मोमीन, अजित भुजबळ, गुरु जाधव, मंगेश थिगळे, संदीप वारे, जितेंद्र मांडगे, अक्षय जावळे यांच्या पथकाने केली आहे.

शेतकऱ्यांना त्यांची वाहने तातडीने देणार

डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले की, पावसाळा तोंडावर आला आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी ट्रॅक्टरची गरज भासणार आहे. त्यामुळे न्यायालयाच्या मंजुरीनंतर तातडीने ही वाहने मालकांना परत करण्यात येणार आहे. त्याचबरोबर आता ट्रॅक्टरची काळजी घेण्याचा सल्ला शेतकऱ्यांना दिला आहे.

शेतकऱ्यांना दिलासा

चोरट्यांनी नवीन ट्रॅक्टर, जीप चोरून नेली होती. त्यातील बहुतांशी वाहनांवरील कर्ज अजूनही फिटले नव्हते. हे वाहने पोलिसांनी जप्त केल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांनी पोलिसांचा यावेळी सत्कार केला.

.......

शेतकरी विठ्ठल खणकर (रा. कावळे पिंपरी, जुन्नर) यांनी सांगितले की, आठ महिन्यांपूर्वी ट्रॅक्टर घेतला होता. ५ दिवसांपूर्वी घरासमोरून चोरीला गेला होता. तो परत मिळाल्याचा आनंद आहे.

सागर ताकवले (रा. पारगाव, दौंड) यांनी सांगितले की, २६ जानेवारीला ट्रॅक्टर घेतला होता. १७ मार्च रोजी चोरीला गेला. ट्रॅक्टर परत मिळण्याची आशा सोडली होती. आज चोरट्यांकडून जप्त केलेला ट्रॅक्टर पाहून डोळ्यांवर विश्वासच बसत नाही.

अमोल भोसले (रा. आळेगाव पागा, शिरूर) यांनी सांगितले की, २ महिन्यांपूर्वी माझ्या घरासमोरून चोरट्यांनी रात्री ट्रॅक्टर चोरून नेला होता.

Web Title: Tractor theft gang arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.