कंत्राटी वीज कामगारांना मजदूर संघाचे सुरक्षा कवच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:10 AM2021-04-16T04:10:42+5:302021-04-16T04:10:42+5:30
पुणे : महावितरण कंपनीकडून कंत्राटी वीज कामगारांच्या सुरक्षेची कोणतीही काळजी घेतली जात नाही. त्यामुळे महाराष्ट्र कंत्राटी वीज कामगार संघाने ...
पुणे : महावितरण कंपनीकडून कंत्राटी वीज कामगारांच्या सुरक्षेची कोणतीही काळजी घेतली जात नाही. त्यामुळे महाराष्ट्र कंत्राटी वीज कामगार संघाने स्वखर्चाने या कामगारांंना विमा सुरक्षा कवच दिले.
कोरोना काळात वीज कंत्राटी कामगारांनी धोका पत्करून अखंडित सेवा बजावली. राज्यभरात ४० कंत्राटी कामगार काम करताना मृत्युमुखी पडले. सरकार किंवा महावितरणकडून कोणतीच आर्थिक मदत या कामगारांना मिळाली नाही.
त्यामुळे महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने (संलग्न भारतीय मजदूर संघ) ज्येष्ठ मार्गदर्शक अण्णाजी देसाई यांच्या प्रयत्नांतून कामगार वेलफेअर फंडांची स्थापना केली. या निधीतून ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या साह्याने संघटनेच्या सदस्यांसाठी १० लाखांची अपघात विमा योजना सुरू केली.
सोपान भाऊका कुलाळ (ता. संगमनेर) यांचे कर्जुले पठार (जि. नगर) वीज उपकेंद्रात अपघाती निधन झाले. त्यांच्या पत्नी प्रियंका कुलाळ यांना आज १० लाखांचा अपघात विम्याचा धनादेश देण्यात आला. संघाचे सरचिटणीस सचिन मेंगाळे, राहुल बोडके, शरद मते, रामदास खराडे, सागर अहिनवे, वीज कंत्राटी कामगार संघाचे अध्यक्ष नीलेश खरात, सागर पवार, उमेश आणेराव यांनी सहकार्य केले.