व्यापार्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण, पिता-पुत्रांना नारायणगाव पोलिसांनी केली अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 12:48 PM2017-10-12T12:48:17+5:302017-10-12T13:03:20+5:30
किराणा व्यापारी असोसिएशनच्या बैठकीत एका व्यापार्याने दुसर्या व्यापार्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना नारायणगाव येथे घडली.
नारायणगाव : दिवाळी निमित्त सवलतीच्या दरामध्ये ग्राहकांना किराणा साहित्याची विक्रीचे हॅण्डवेल छापले, या कारणावरून किराणा व्यापारी असोसिएशनच्या बैठकीत एका व्यापार्याने दुसर्या व्यापार्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना नारायणगाव येथे घडली. नारायणगाव पोलिसांनी मारहाण करणार्या पिता-पुत्रावर गुन्हा दाखल केला आहे.
ज्ञानेश्वर भोर व प्रमोद ज्ञानेश्वर भोर (दोघे रा. नारायणगाव, ता. जुन्नर) यांच्यावर नारायणगाव पोलीस ठाण्यात भा. द. वि. कलम ३२५, ३२३, ५०४, ३४नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची फिर्याद सचिन उत्तमचंद शेलोत (वय ३७, रा. खोडद रोड, नारायणगाव ता. जुन्नर) यांनी दिली आहे.
नारायणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किराणा व्यापारी अशोसिएनच्या खोडद रोड येथील हॉलमध्ये सर्व व्यापार्यांसाठी दिवाळी निमित्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत आशीर्वाद ट्रेडिंग कंपनीचे सचिन बाळासाहेब शेलोत व धनंजय (धनेश) बाळासाहेब शेलोत हे दुकानामध्ये दिवाळी निमित्त सवलतीच्या दरामध्ये किराणा मालाची विक्री करतात. या कारणावरून ज्ञानेश्वर भोर व प्रमोद भोर यांची शेलोत यांच्या बरोबर शाब्दिक बाचाबाची झाली असता भोर यांनी धनंजय शेलोत यांना लाथाबुक्यांनी पोटात, चेहर्यावर व डोक्याला मारहाण केल्याने त्यास गंभीर दुखापत झाली. तसेच सचिन शेलोत हे भांडण सोडविण्यासाठी गेले असता त्यांनाही शिवीगाळ व धक्काबुक्की करण्यात आली. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास नारायणगाव पोलीस हे करीत आहेत.