रेशनिंगचे धान्य अडत व्यापाऱ्याकडे सापडले
By admin | Published: December 22, 2016 01:44 AM2016-12-22T01:44:05+5:302016-12-22T01:44:05+5:30
सुपे (ता. बारामती) येथील उपबाजार समितीतील एका अडत व्यापाऱ्याकडे रेशनिंगचा गहू आणि तांदुळाची सुमारे ३१० कट्टे बुधवारी
सुपे : सुपे (ता. बारामती) येथील उपबाजार समितीतील एका अडत व्यापाऱ्याकडे रेशनिंगचा गहू आणि तांदुळाची सुमारे ३१० कट्टे बुधवारी (दि. २१) अवैध स्वरुपात असलेला साठा तालुका दक्षता समितीने उघडकीस आणला. यासंदर्भात नायब तहसीलदारांनी भेट दिली.
येथील आठवडेबाजार असल्याने येथील उपबाजार समितीमध्ये भुसार मालाची खरेदी विक्री होत असते. यावेळी येथील आडत व्यापारी रमणलाल प्रेमचंद तेली यांच्या दुकानात रेशनिंग तांदळाचे ६० कट्टे तर गव्हाचे २५० कट्टे दक्षता समितीच्या सदस्या सुमिता भारत खोमणे, रोहिणी संजय चांदगुडे आणि बापुराव कोंडीबा भिसे यांना आढळुन आली. त्यांनी तातडीने तहसील विभागाला ही माहिती दिली. त्यानंतर बारामतीचे नायब तहसीलदार भोसले यांनी घटनास्थ्ळी भेट दिली. यावेळी सापडलेल्या सुमारे ३१० गहू व तांदळाच्या कट्ट्यांचा पंचनामा करण्याचे काम उशीरापर्यंत तलाठी आर. आर. जगदाळे यांचे सुरु होते. यावेळी जगदाळे यांनी ओम ट्रेडींग कंपनी कडुन काही कट्टे तसेच शेतकऱ्यांकडुन काही कट्टे माल आलेला आहे. यासंदर्भात तेली यांच्या दुकानातील पावत्या पुस्तके ताब्यात घेतल्याची माहिती जगदाळे यांनी दिली. दरम्यान बारामतीचे तहसीलदार हनुमंत पाटील यांच्या संपर्क साधला असता ते म्हणाले की, दुकानदाराकडे आलेला रेशनिंगचा माल हा थेट दुकानातुन आला आहे का? याची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्यात येईल.(वार्ताहर)