"कोरोना से मरेंगे कम, लॉकडाऊन से मरेंगे हम" चे फलक घेऊन व्यापाऱ्यांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:11 AM2021-04-09T04:11:53+5:302021-04-09T04:11:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्य शासन व महापालिकेने अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व दुकाने बंद करण्याबाबत घेतलेल्या निर्णयाविरोधात, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्य शासन व महापालिकेने अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व दुकाने बंद करण्याबाबत घेतलेल्या निर्णयाविरोधात, गुरूवारी पुणे व्यापारी महासंघाच्यावतीने निषेध व्यक्त करीत लक्ष्मी रस्त्यावर आंदोलन करण्यात आले़ हाताला काळी फित लावून व ‘कोरोना से मरेंगे कम, लॉकडाऊन से मरेंगे हम’ चे काळे फलक घेऊन व्यापऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घेत शासनाच्या निर्णयाचा निषेध केला़
विजय टॉकिज ते क्वॉर्टर गेटपर्यंत ४ किमी अंतरावर रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून सकाळी अकरा ते दुपारी बारा वाजेपर्यंत हे आंदोलन करण्यात आले़ यावेळी सहभागी व्यापाऱ्यांनी सोशल डिस्टसिंगचे पालन करीत, हातात ‘कोरोना से मरेंगे कम, लॉकडाऊन से मरेंगे हम’, ‘मत छिनो हमारा कारोबर, हमारा भी है घरबार’ चे फलक घेऊन राज्य शासन व पुणे महापालिकेच्याअत्यावश्यक सेवा वगळून सर्व दुकाने ३० एप्रिल पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय मागे घेण्याबाबतची मागणी केली़
पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका व सचिव महेंद्र पितळीया यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात सराफ, कापड, इलेक्ट्रॉनिक्स, होजिअरी, मेटल, भांडी, कॅम्प्युटर, टिम्बर, स्टील, प्लायवुड, हार्डवेअर, टाईल्स, स्टेशनरी, आॅटोमोबाईल आदी व्यावसायिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़
फत्तेचंद रांका यांनी, या पूर्वीच्या लॉकडाउन मुळे व्यापारी अगोदरच आर्थिक संकटात सापडला असल्याचे सांगून, आजही ग्राहक कमी असल्याकडे लक्ष वेधले़ व्यवसायासाठी घेतलेल्या दुकानाचे भाडे, कर्जाची परतफेड, लाईट बिल, कर्मचारुयांचे पगार, टॅक्सची सोय करता करता व्यापारी मेटाकुटीला आले आहेत़ त्यातच बँकाही आता हप्त्यासाठी थांबत नाही़ त्यामुळे अशावेळी व्यापाऱ्यांनी जगायचे कसे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला़ तसेच आणखी महिनाभर दुकाने बंद ठेवण्यास सांगितल्याने व्यापारी आणखीनच संकटात जातील, त्यामुळे आम्हाला व्यवसायास परवानगी द्यावी अशी मागणीही त्यांनी केली़
दरम्यान व्यापारी वर्गाकडून कोरोनाचे लसीकरण शिबीर आयोजित करण्यात येईल, असे यावेळी सचिव महेंद्र पितळीया यांनी सांगितले़
------------------------------