आळंदीतील व्यापाऱ्यांचा संपूर्ण लॉकडाऊनला विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:10 AM2021-04-09T04:10:36+5:302021-04-09T04:10:36+5:30
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने ३० मार्चपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापने बंद ठेवण्याचे आदेश शासनाकडून देण्यात ...
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने ३० मार्चपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापने बंद ठेवण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले आहेत. राज्य सरकारने काढलेल्या आदेशानुसार, अत्यावश्यक सेवा वगळून सर्व आस्थापने बंद ठेवण्याचे, संचारबंदी व जमावबंदी तसेच प्रत्येक शनिवार व रविवारी कडक लॉकडाऊन केले जाईल. मात्र, या लॉकडाऊनला व्यापारी संघटनांनी विरोध केला आहे. लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची झाली आहे. आस्थापने बंद असतानाही बँकेचे व्याज सुरू असून वेळेवर हप्ता भरावाच लागतो. त्यामुळे व्यापारी व व्यापाऱ्यांकडे काम करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे किमान आठवड्यातील पाच दिवस सकाळी ९ ते ६ या वेळेत आस्थापने उघडी ठेवण्याची मागणी व्यापारी वर्गाकडून पोलीस आणि नगर परिषद यांच्याकडे करण्यात आली आहे.
दरम्यान, लॉकडाऊनचा निर्णय हा शासन स्तरावरील असून आपल्या मागण्या जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे सादर करण्यात येईल अशी ग्वाही आळंदी नगर परिषदचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी दिली. याप्रसंगी नगरसेवक प्रशांत कुऱ्हाडे, माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर, मच्छिंद्र शेंडे, नंदकुमार वडगावकर, ज्ञानेश्वर दिघे, माऊली गुळुंजकर, सुनील रानवडे, राजेंद्र पवार, चारुदत्त प्रसादे, जनककुमार जोशी आदिंसह व्यापारीवर्ग उपस्थित होता.
०८आळंदी विरोध
आळंदी नगर परिषद व पोलीस प्रशासनाला लेखी निवेदन देताना व्यापारी.