बाणेर येथील वाहतूक विभागाच्या नो पार्किंग कारवाई विरोधात व्यापारी व नागरिक आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2019 02:14 PM2019-10-18T14:14:36+5:302019-10-18T14:23:37+5:30
नो पार्किंग झोन रद्द नाहीच; वाहतूक पोलीस प्रशासन कारवाईवर ठाम..
पाषाण: वाहतूक विभागाच्या नो पार्किंग कारवाई विरोधात बाणेरमध्ये व्यापाऱ्यांनी बंद पुकारला होता. व्यापारी संघटनांच्या वतीने व डॉक्टर संघटनांच्यावतीने पुकारण्यात आलेल्या आंदोलनात पोलीस प्रशासनाकडून कोणतेच आश्वासन न मिळाल्याने व्यापारी व नागरिक आक्रमक झाले.
कुंदन मंगल कार्यालयासमोर मुख्य बाणेर रस्त्यावर हजारोच्या संख्येने नागरिक व व्यापारी व स्थानिक लोकप्रतिनिधी नगरसेवक अमोल बालवडकर, ज्योती कळमकर ,स्वप्नाली सायकर , नितीन कळमकर, लहू बालवडकर, विशाल विधाते , मनोज बालवडकर, प्रकाश बालवडकर , प्रकाश तापकीर यांनी रस्त्यावर बसून पोलीस प्रशासनाचा निषेध व्यक्त केला व रास्ता रोको करत आंदोलन केले. गेले काही आठवडे बाणेर येथे सहा किलोमीटर परिसरात दोन्ही बाजूला नो पार्किंग झोन करण्यात आले आहे यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून व्यापारी वर्गही त्रस्त झाला आहे. नो पार्किंग झोन विरोधात बाणेर येथील व्यापारी संघटना व डॉक्टर असोसिएशन तसेच विविध संघटनांनी बाणेर बंदला पाठिंबा दर्शवला होता. पोलीस आयुक्त विधाते यांनी आंदोलकांना समजवण्याचा प्रयत्न केला. परंतु, वाहतूक विभागाचे डीसीपी यांनी याबाबत निर्णय घ्यावा अशी जमावाने मागणी केली. वाहतूक विभागाचे डीसीपी हे या या आंदोलनावेळी उपस्थित न राहिल्याने काहीकाळ जमाव आक्रमक झाला होता. बाणेर परिसरात अचानक झालेल्या रास्ता रोकोमुळे मोठ्या प्रमाणात बाणेर रस्त्यावर वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली होती दरम्यान एसीपी विधाते यांनी आंदोलकांना समजावत आंदोलकांनी शिष्टमंडळ घेऊन डीसीपी कार्यालयात सलावे अशी विनंती केली त्यानुसार बंद कायम ठेवून व्यापारी व स्थानिक लोकप्रतिनिधींचे शिष्टमंडळ वाहतूक विभागाच्या डीसीपी ना भेटण्यासाठी गेले यावेळी रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले.
पोलीस प्रशासनाने नो पार्किंग संदभार्तील निर्णय त्वरित मागे न घेतल्यास व्यापारी संघटना व डॉक्टर असोसिएशन तसेच बाणेर परिसरातील विविध संघटना या निर्णयाच्या विरोधात मतदानावर बहिष्कार टाकतील असा इशारा देखील बाणेर व्यापारी असोसिएशन च्या वतीने देण्यात आला. ऑनलाइनसाठी घेतली तर घेणे व्यापारी असोसिएशन चे पदाधिकारी स्थानिक नगरसेवक व विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते यांनी वाहतूक शाखेच्या डीसीपींची भेट घेत निर्णय रद्द करण्यासंदर्भात निवेदन दिले.
नो पार्किंग झोन रद्द नाहीच वाहतूक पोलीस प्रशासन कारवाईवर ठाम
वाहतूक डीसीपी पंकज देशमुख यांनी बाणेर व्यापारी असोसिएशन स्थानिक लोकप्रतिनिधी व विविध पक्षाचे कार्यकर्ते यांच्या शिष्टमंडळाला या नो पार्किंग झोनबाबत माहिती दिली व नो पार्किंग झोन रद्द करता येणार नाही. पुढील आठवड्यात पालिका प्रशासन व वाहतूक विभाग तसेच अन्य विभागाच्या संयुक्त बैठकी मध्ये याबाबत निर्णय घेता येईल, असे पंकज देशमुख यांनी आलेल्या शिष्टमंडळाला सांगितले.यामुळे बाणेर मधील नागरिकांच्या वर असलेली नो पार्किंग मधील कारवाईची टांगती तलवार ही सध्या तरी कायम राहणार आहे असेच स्पष्ट होते.