व्यापारी आणि कामगारांनी कोरोना चाचणी करून घ्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:10 AM2021-03-20T04:10:31+5:302021-03-20T04:10:31+5:30
मंचर : कोरोना प्रादुर्भावाची दुसरी लाट जोराने पसरत आहे. ही लाट थोपविण्यासाठी शासनाने काही निर्बंध जारी केले आहेत. त्याच ...
मंचर : कोरोना प्रादुर्भावाची दुसरी लाट जोराने पसरत आहे. ही लाट थोपविण्यासाठी शासनाने काही निर्बंध जारी केले आहेत. त्याच निर्बंधांच्या अंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोनाचे सुपर स्प्रेडर असणाऱ्या व्यापारी वर्गाला व त्यांच्या कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी करून घेणे अनिवार्य केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या आवाहनाला साथ देत मंचर परिसरातील व आंबेगाव तालुक्यातील सर्व व्यापारी बांधवांनी आपली स्वतःची व आपल्या कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन मंचर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष अजय घुले यांनी केले आहे.
प्रांताधिकारी सारंग कोडीलकर, तहसीलदार रमा जोशी, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, तालुका आरोग्य अधिकारी सुरेश ढेकळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अंबादास देवमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली व्यापारी कोरोना चाचणी याबाबत मंचर व्यापारी महासंघाच्या चर्चेत अजय घुले बोलत होते. या वेळी किराणा-भुसारचे अध्यक्ष सोमनाथ खुडे, सुवर्णकार असोसिएशनचे अध्यक्ष सागर काजळे, कापड व्यावसायिकांचे अध्यक्ष गणपत कोकणे, फुटवेअर असोसिएशनचे अध्यक्ष भरत मेंगडे, योगेश बाणखेले, पंडित माशेरे, आशिष पुंगलिया, ऍग्रो इनपुट असोसिएशनचे अध्यक्ष महेश मोरे, साजिद आतार, हॉटेल असोसिएशनचे प्रणव थोरात, शंकर निघोट, सुमित पुनमिया, संदिप म्हसे, हार्डवेअर असोसिएशनचे संदीप बाणखेले, राहुल थोरात आदी उपस्थित होते.
कोरोनाची दुसरी लाट झपाट्याने वाढत आहे. हा संसर्ग रोखणेसाठी शासन स्तरावर जोरदार प्रयत्न सुरू असून काही निर्बंध लादले जात आहेत. कोरोनाची दुसरी लाट थोपविण्यासाठी शासना बरोबरच प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. हे प्रयत्न करताना सर्व नागरिकांनी स्वतःची व स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे. शासनाच्या आदेशांचे व नियमांचे काटेकोर पालन केले तर या लढ्यात आपल्याला लवकर यश येऊ शकते व लोकडाऊनचे संकट टळू शकते. असेही अजय घुले यांनी सांगितले.
शासनाच्या काही निकषांनुसार किरकोळ व्यापार करणारे व्यापारी व दुकानदार यांच्या व्यावसायिक अस्थापनांमध्ये नागरिक गर्दी करत असतात. ज्या व्यापार - व्यवसायांवर ग्राहकांची प्रत्येक्ष वर्दळ असते आशा व्यावसायिक आस्थापनेतील एखादी व्यक्ती कोरोनाबाधित झाली तर त्याच्यामुळे अनेकांना कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. ही बाब टाळण्यासाठी कोरोनाचे असे सुपर स्प्रेडर शोधण्याची मोहीम शासनाने हाती घेतली आहे. त्यानुसारच सर्व व्यापार-धंदे करणाऱ्या व्यापाऱ्यांची व त्यांच्या कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करणे शासनाने अनिवार्य केले आहे. शासनस्तरावर ही कोरोना चाचणी मोफत करण्यात येत असल्याची माहिती यावेळी अजय घुले यांनी दिली.