कांदा भाववाढीचा व्यापाऱ्यांनाच लाभ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2019 01:50 PM2019-12-05T13:50:35+5:302019-12-05T13:53:43+5:30
Onion Price Updates : सामान्यांच्या डोळ्यात कांद्याच्या तिखटपणापेक्षा भाववाढीनेच पाणी..
संजय बारहाते-
टाकळी हाजी : सध्या कांद्याच्या भावाने विक्रमी पातळी गाठली आहे. सामान्यांच्या डोळ्यात कांद्याच्या तिखटपणापेक्षा भाववाढीनेच पाणी आले आहे. भाववाढीमुळे शेतकरी खुशीत असल्याची चर्चा होत आहे; मात्र खरा लाभ शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यालाच झाला आहे. कांद्याचे भाव गेल्या डिसेंबरमध्ये नीचांकी पातळीवर होते. नीचांकी भावाने शेतकऱ्यांच्या प्रपंचाचा गाडाच मोडून गेला होता. यंदाही अतिवृष्टीने बहुतांश शेतकऱ्यांचे कांदापीक सडल्याने मालच कमी निघत आहे. परिणामी भाववाढीची लॉटरी व्यापाऱ्यांनाच पावली आहे.
यंदा नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये कांद्याचे भाव कडाडल्याने चर्चा गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरू झाली. राज्यात कांदा उत्पादन प्रामुख्याने नाशिक, पुणे, अहमदनगर, सोलापूर जिल्हयात सर्वाधिक होते. खरीप व रब्बी या दोन्ही हंगामात कांद्याचे उत्पादन होत असले तरी खरिपात पीक अतिपावसामुळे गेले. रब्बीलाही कांदारोपांमध्ये पाणी साचून राहिल्याने रोपांची मरतुक मोठ्या प्रमाणात झाली. रोपेच कमी असल्याने रब्बी कांदा लागवडीखालील क्षेत्र निम्म्याने घटले. कांदापिक लावगडीनंतर साडेचार महिन्यांत येत असल्याने
विहीर बागायतदार शेतकरीसुद्धा कांद्याचे पीक घेतो.
गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात कांद्याच्या नीचांकी पातळीचा अनेक शेतकºयांची दैना झाली होती. टाकळी हाजी येथील शेतकरी महिला मनीषा बारहाते यांची प्रत्येकी ५० किलोच्या
३२ पिशव्यांची कांदापट्टी अवघी
चार रुपये हाती आली होती. कमी भावामुळे वैतागलेल्या शेतकºयांनी केंद्रीय कृषिमंत्र्यांना कांद्याची रक्कम व बांगड्या आहेर पाठविल्याची चर्चा राज्यभर गाजली.
कांद्याचे पीक उत्पादनासाठी बी, मशागत, शेणखत, रासायनिक खते, कीटकनाशके, वीजबिल, लागवड, काढणी, मजुरी यांसाठी सुमारे एकरी ६० ते ७० हजार रुपये खर्च येतो. यंदा तर रोपे पावसाने खराब झाल्याने हा खर्च एक लाखाच्या घरात जाण्याची शक्यता आहे, असे प्रगतिशील शेतकरी सोनभाऊ मुसळे यांनी सांगितले. गेल्या वर्षी कांद्याला मातीमोल भाव मिळाल्याने उत्पादन खर्चसुद्धा मिळत नव्हता. हजारो शेतकऱ्यांनी कांदा विक्रीस नेण्यापेक्षा कांदाचाळीमध्ये साठवून ठेवण्यावरच भर दिला. मात्र साठवलेला कांदाही पावसाचे पाणी चाळीत साठून सडून गेला. शेतकऱ्यांना पीक कर्ज परत
बँकेत भरता आले नाही. उधारीवर आणलेल्या खते, कीटकनाशकाचे बिलही देता आले नाही.
उधारी थकल्याने यंदा शेतकऱ्यांनी पुन्हा गेल्यावर्षीसारखे नुकसान होऊ नये, म्हणून पाच-सहा रुपये किलो दराने व्यापाऱ्याला कांदा विकून टाकला होता. परिणामी कांदा भाववाढीचा फायदा मोठे शेतकरी व व्यापारी यांनाच झाला. लहान कांदा उत्पादक शेतकरी मात्र भाव आहे, पण कांदाच नसल्याने निराश झाला आहे. कर्जाचा बोजा मात्र वाढला आहे.
....
शिरूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात रब्बी हंगामामध्ये कांद्याची लावगड केली जाते. सप्टेंबरमध्ये रोपे टाकतात. मात्र अतिपावसाने रोपे व ज्यांनी कांदे लागवड केली, ती पण गेल्याने दुबार लागवडीचे संकट बळीराजावर आले असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्या सुनीता गावडे यांनी दिली.
...
कांदा लागवड महिला मजुरांना घेऊन दिवसा करावी लागते, मात्र काही वेळा वीज रात्री सोडतात दिवसा बंद ठेवतात. त्यामुळे लागवडीसाठी मोठा प्रश्न उभा राहत असून दोन हजार रुपये भाड्याने डिझेल जनरेटर आणून लागवड करावी लागते.
.......
कांद्याला हवाय हमीभाव : कांद्याला प्रतिवीस रुपये हमीभाव दिला तरी शेतकरी व ग्राहक दोन्ही समाधानी होतील. मात्र शेतकरी अनेक वर्षे मागणी करूनही हमीभाव शासन देत नाही. तसेच शेतकरी व किरकोळ विक्रेता यामध्ये मोठी तफावत असून, शेतकऱ्याकडून घेतलेला कांदा ग्राहकाला दुप्पट भावात घ्यावा लागत आहे.
......
गेल्यावर्षी मातीमोल भाव मिळाल्याने यावर्षी लवकरच कांदा विकला
कांदा भाववाढीचा फायदा व्यापाऱ्यांना व मोठ्या शेतकऱ्यांना
यंदाही अतिपावसामुळे लागवडी घटल्या
खराब हवामानाचा पुन्हा कांद्याला फटका