बघणाऱ्याच्या अंगावर ''काटे'' उभे राहतील अशी या गावाची परंपरा !
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2019 05:53 PM2019-11-09T17:53:10+5:302019-11-09T18:06:17+5:30
श्रद्धा म्हटली की धोका, भीती अशा कोणत्याही गोष्टींना थारा दिला जात नाही. पुणे जिल्ह्यातील गुळुंचे या गावात भरणाऱ्या यात्रेतही काटेबारस नावाची आगळीवेगळी प्रथा आहे.
पुणे (नीरा) : श्रद्धा म्हटली की धोका, भीती अशा कोणत्याही गोष्टींना थारा दिला जात नाही. पुणे जिल्ह्यातील गुळुंचे या गावात भरणाऱ्या यात्रेतही काटेबारस नावाची आगळीवेगळी प्रथा आहे . या गावात काटे असलेल्या बाभळीच्या ढिगावर भाविक उड्या घेतात. त्यातही चक्क उघड्या अंगाने. ही यात्रा जवळपास दहा दिवस साजरी होत असल्याने आजूबाजूच्या पंचक्रोशीतून गर्दी होत असते.
गेली अनेक वर्ष ही या यात्रेची परंपरा पाळली जाते. द्वादशीला भल्या पहाटे चार वाजता शिवभक्त मंदिराशेजारील ओढ्यात अंघोळ करून गावाबाहेरील मानाच्या कठीचे दर्शन घेऊन मंदिरापर्यंत दंडवत घालत येतात. गुळुंचे गावासह बारा वाड्यातील ग्रामस्थांनी ग्रामदैवतास पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात. त्यानंतर मंदिरासमोर ढोलांचा आवाज घुमू लागतो आणि सुरु होतो. छबिन्याच्या खेळ. ढोल, ताशे व झांजेच्या कडकडाटात अवघा आसमंत घुमू लागतो. भक्त एकमेकांवर मुक्तपणे गुलाल - खोबऱ्यांची उधळण करत 'हर भोला हर महादेवा'ची गर्जना करतात. त्यानंतर उत्सव मुर्तीसह दोन्ही पालख्या गावाबाहेरील काठीच्या भेटीसाठी वाजत गाजत निघतात. पुढे पालखीची प्रदक्षिणा पूर्ण होते. आणि सुरु होते ही प्रथा.
त्यासाठी गोलाकार आकारात मोठ्या प्रमाणात जवळपास ट्रकभर काटे गोलाकार मांडले जातात. पालखी त्या गोलाभोवती प्रदक्षिणा घालते आणि श्रद्धेपायी गावकरीही या काट्यात एका पाठोपाठ उड्या घेतात. बघतानाही अंगावर काटा आणणारी ही प्रथा आणि यात्रा हीच या गावाची ओळख आहे.