परंपरा पालखीसोहळ्याची

By admin | Published: July 9, 2015 02:38 AM2015-07-09T02:38:28+5:302015-07-09T02:38:28+5:30

संत आणि भगवंताची भेट घडविण्यासाठी तुकोबारायांचे तृतीय चिरंजीव तपोनिधी नारायणमहाराज यांनी सुरू केलेल्या पालखी सोहळ्याची परंपरा देहूकरांनी आजही अखंड सुरू ठेवली आहे.

Tradition Palkhiohalchi | परंपरा पालखीसोहळ्याची

परंपरा पालखीसोहळ्याची

Next

मंगेश पांडे, पिंपरी
संत आणि भगवंताची भेट घडविण्यासाठी तुकोबारायांचे तृतीय चिरंजीव तपोनिधी नारायणमहाराज यांनी सुरू केलेल्या पालखी सोहळ्याची परंपरा देहूकरांनी आजही अखंड सुरू ठेवली आहे.
सकळा वैष्णव वाटे जीव, प्राण
तो हा नारायण देहूकर
अशाप्रकारे निळोबारायांनी आपल्या अभंगात नारायण महाराजांचे वर्णन केले आहे.
पालखी सोहळ्याला ३३० वर्षांपूर्वी सुरुवात झाली. तुकाराममहाराजांचे तृतीय चिरंजीव नारायणमहाराज माऊली-तुकोबारायांच्या पादुका घेऊन आषाढी वारीसाठी पंढरीला जात. पालखी सोहळ्याचे जनक नारायणमहाराज यांची देहूतील मुख्य देऊळवाड्याच्या उत्तर दिशेला समाधी आहे. शेजारीच पवित्र इंद्रायणी नदी आहे. या स्थळालादेखील अनन्यसाधारण महत्त्व आहे. पूर्वी येथे समाधी व त्यावर जुन्या पद्धतीचे बांधकाम होते. तसेच समोरची जागाही अपुरी होती. २००४ ला संस्थानने या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार संपूर्ण मंदिराचे बांधकाम मार्बलमध्ये करण्यात आले. सुंदर आणि रेखीव असे हे मंदिर सध्या येथे उभे आहे. पालखी प्रस्थान सोहळ्याच्या दिवशी अगोदर नारायणमहाराजांच्या पादुकांचे पूजन केले जाते. मुख्य देऊळवाड्यात विठ्ठल-रुक्मिणी स्वयंभू मूर्ती, राम मंदिर, महादेव मंदिर, शिळा मंदिर येथील दर्शनानंतर भाविक उत्तर दरवाजाने नारायणमहाराज यांच्या समाधी दर्शनासाठी जातात.
दर वर्षी श्रावण महिन्यात नारायणमहाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त संस्थानाकडून धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सात दिवसांचा हरिनाम सप्ताह असतो. नारायणमहाराजांनी सुरू केलेली पालखी सोहळ्याची परंपरा देहूकरांनी कायम ठेवली आहे. नारायणमहाराज यांच्यानंतर देहूकरांसह विविध दिंड्या सोहळ्यात सहभागी होऊ लागल्या. दर वर्षी सोहळ्याचा विस्तार वाढतच आहे. ज्येष्ठांसह तरुणांचाही सहभाग वाढत आहे. प्रस्थान सोहळ्याने आषाढी वारीला सुरुवात होते. हा पालखी सोहळा म्हणजे वारकऱ्यांसाठी एक पर्वणीच असते. मनात भगवंताच्या भेटीची आस आणि मुखी हरिनामाचा गजर असतो. पालखी पंढरीकडे मार्गस्थ होत असताना मार्गात भारूड, गोल व उभे रिंगण आदी कार्यक्रम असतात. लहान-मोठा असा भेदभाव नसतो.
पहिला मुक्काम इनामदारवाड्यात
प्रस्थान झाल्यानंतर पालखी पहिल्या मुक्कामासाठी इनामदारवाड्यात असते. मुख्य देऊळवाड्याच्या शेजारी दक्षिण दिशेला अवघ्या पन्नास मीटर अंतरावर हा वाडा आहे. येथे तुकोबारायांचे छोटे मंदिरदेखील आहे. वाड्याच्या काही भागाची दुरुस्तीही करण्यात आली. मुख्य दरवाजा आणि बाहेरील बांधकाम जुन्या पद्धतीचे आहे. पालखी मुक्कामाच्या दिवशी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक गर्दी करतात. येथे महाराजांच्या पादुकांचे पूजन शासकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते केले जाते.

Web Title: Tradition Palkhiohalchi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.