पौष पौर्णिमा यात्रेच्या मुहूर्तावर जेजुरीत भरला आहे गाढवांचा पारंपरिक बाजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 11:52 AM2018-01-01T11:52:49+5:302018-01-01T11:56:44+5:30
कुलदैवत जेजुरीच्या खंडोबा देवाची पौष पौर्णिमा यात्रा नववर्षाच्या मुहूर्तावर आजपासून (दि. १) सुरु झाली आहे. या निमित्ताने दरवर्षी जेजुरीत गाढवांचा पारंपरिक बाजार भरतो.
जेजुरी : कुलदैवत जेजुरीच्या खंडोबा देवाची पौष पौर्णिमा यात्रा नववर्षाच्या मुहूर्तावर आजपासून (दि. १) सुरु झाली आहे. या निमित्ताने दरवर्षी जेजुरीत गाढवांचा पारंपरिक बाजार भरतो. या बाजारासाठी महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने गाढवे जेजुरीत दाखल झाले आहेत.
जेजुरीच्या बंगाली पटांगणात अनेक पिढ्यांपासून गाढवांचा बाजार भरतो. येथे जागा कमी पडत असल्याने पालखी तळावरही हा बाजार भरू लागला आहे. ज्या समाजाचा उदरनिर्वाह गाढवावर अवलंबून आहे, विविध समाजातील लोक गाढवांच्या खरेदी-विक्री व कुलदैवताच्या दर्शनासाठी दरवर्षी पौष पौर्णिमेला जेजुरीत येतात.
समाजील अनेकांची उपजीविका गाढवांवर अवलबून आहे. डोंगर पठारावर जेथे रस्त्याची सोय नाही, तेथे दगड माती, वाळू, विटा तसेच विविध सामान वाहून नेण्यासाठी गाढवांचा वापर केला जातो. सध्याच्या यांत्रिक युगात गाढवाच्या पाठीवरचे ओझे कमी झाले आहे. यंत्रयुगात गाढवांची मागणी कमी झाली असली तरी यात्रेनिमित्त देवदर्शनासाठी येण्याची प्रथा आजवर टिकून आहे.
दोन ते तीन दिवस चालणाºया गाढवांच्या बाजारासाठी गुजरातमधून सुमारे साडेतीनशे काठेवाडी गाढवे विक्रीसाठी येथे आली आहेत. तसेच महाराष्ट्रच्या विविध भागातूनही मोठ्या संख्येने गाढवे दाखल झाली आहेत. गाढवांच्या खरेदी विक्रीला सुरवात झाली असून गाढवांची किंमत, त्यांची वये व दातावरून ठरत असते. दोन त तीन हजारापासून ते तीस हजारापर्यंत गाढवांची विक्री होते. काठेवाडी गाढवांना चांगली किंमत मिळते.
गाढवांच्या बाजारानंतर वैदू समाजाचा कुस्तीचा आखाडा येथे दरवर्षी भरतो. तसेच जेजुरीत वैदू व भातु कोल्हाटी समाजाची जातपंचायत पूर्वी भरत असत. या जात पंचायती प्रथा बंद झाल्या आहेत.