पारंपरिक तमाशा फड कर्जाच्या विळख्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 03:05 AM2018-05-28T03:05:46+5:302018-05-28T03:05:46+5:30
तमाशा कलावंतांवर उपासमारीची वेळ येत आहे. तमाशा सुरू ठेवण्यासाठी काढलेल्या कार्जाची फेड वेळेवर करता करता तमाशाचालकांच्या नाकीनऊ येत असून आॅर्केस्ट्राच्या वाढत्या प्रमाणामुळे तमाशा कालबाह्य होत आहे.
- भरत निगडे
नीरा - पूर्वी गावातील जत्रांची शान असणारा तमाशा काळाच्या ओघात मागे पडला आहे. कुण्या गावाचं आलं पाखरू... याभावजी...बसा रावजी, सोळावं वरीस धोक्याचं यांसारखी कायम तोंडी गुणगुणली जाणारी पारंपरिक गीते आजही लोकप्रिय आहेत; मात्र या दोन दशकांचा विचार करता जनमानसाच्या हृदयावर राज्य करू शकतील अशी नवीन गीते तमाशात पुन्हा निर्माण झाली नाहीत किंवा लोकप्रिय झाली नाहीत. पूर्वीच्या तुलनेत तमाशांच्या फडाचे प्रमाण कमी झाले असून, तमाशा कलावंतांवर उपासमारीची वेळ येत आहे. तमाशा सुरू ठेवण्यासाठी काढलेल्या कार्जाची फेड वेळेवर करता करता तमाशाचालकांच्या नाकीनऊ येत असून आॅर्केस्ट्राच्या वाढत्या प्रमाणामुळे तमाशा कालबाह्य होत आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळात तमाशाला चांगले दिवस होते. त्यानंतर ८०च्या दशकात तमाशा मंडळे वाढली. विसाव्या शतकाच्या पूर्ततेपर्यंत तमाशा मंडळांची संख्या; तसेच लोककलावंतांचा आदर मानसन्मान होत होता.
मात्र, गेल्या ही लोककलेला मारक ठरली. पाशात्य नृत्यप्रकारांची तरुणांवर असलेली भुरळ, मराठी, तमीळ, हिंदी चित्रपटांची मोठ्या प्रमाणावर झालेली निर्मिती तसेच वाढती चित्रपटगृहे यांकडे जनमानसाचा कल राहिला. त्यानंतर तमाशा केवळ यात्रा किंवा जत्रेचा एक औपचारिक भाग म्हणून आणला आणि पहिला जाऊ लागला. चौफुल्यासारखी ठिकाणे हळूहळू गर्दी कमी खेचू लागली. त्यातही तमाशाचा नाद वाईट! घराचं, जमीनजुमल्याचं पार वाटोळे असा प्रघात पडला आणि पांढरपेशी माणूस तमाशापासून दुरावला.
एक लोककला म्हणून तमाशाकडे पाहण्याची जनमानसाची दृष्टी हरवत चालली. मात्र याचा परिणाम सर्वच तमाशा फडांवर झाला. आधीच कर्ज काढून सुरु केलेली तमाशा मंडळे ओस पडू लागली. सुपारी मिळविण्यासाठी यात्रा काळात राहुट्या उभारल्या जाऊ लागल्या. तिकिटांवरचे खेळ कमी झाले. चौफुला, कोल्हापूर यांसारखी गावांची नावे लोककलेशी निगडित राहिली. मात्र, या काळात शासनाच्या दुर्लक्षामुळे नवीन कलावंत या क्षेत्रात येण्याचे प्रमाण प्रचंड घटलेले पाहायला मिळते.
कर्ज मिळण्यास अडचणी
तमाशा सुरु करण्यासाठी त्याचे साहित्य खरेदी करण्यासाठी बँकांकडून कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळत नाही. मोठ्या भांडवलदाराला गाठून सहकर्जदार म्हणून तमाशा फड चालक कर्ज काढतात. आजही मोठ्या तमाशांच्या बाबतीत १०० ते १५० लोकांचा संसार तमाशावर चालतो. यात्रा काळात तमाशांना मागणी असते. चार महिन्यांचा काळ सोडला तर उर्वरित आठ महिने बसून काढण्याची वेळ कलावंतांवर येते. या काळात काही न काही बिदागी कलावंतांना मालकांकडून मिळते मात्र या बिदागीपोटी तमाशा मालक आणखीन कर्जात बुडालेले पाहायला मिळतात.
शासनाच्या मदतीची अपेक्षा
आजकाल आॅर्केस्ट्राला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या बंधनामुळे रात्री दहा नंतर खेळ करता येत नाहीत. रात्रीच्या वेळी आकर्षक विद्युत रोषणाईत तमाशा पाहायला चांगला वाटतो. मात्र दुपारच्या वेळेत आॅर्केस्ट्राची सुपारी घेण्याकडे गावांचा कल वाढत आहे. यामुळे तमाशाची फरफट होत असून शासनाने वेळीच याकडे लक्ष देण्याची मागणी तमाशा कलावंतांकडून होत आहे.