पारंपरिक विद्यापीठांत ‘पुणे’ पहिले, ‘टीएचई’कडून दर वर्षी क्रमवारी जाहीर

By पवन देशपांडे | Published: September 29, 2018 12:50 AM2018-09-29T00:50:24+5:302018-09-29T00:51:22+5:30

‘द टाइम्स हायर एज्युकेशन’ (टीएचई) क्रमवारीमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पारंपरिक विद्यापीठांमध्ये देशात पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. तर, इतर विद्यापीठे व शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यापीठ संयुक्तपणे सहाव्या स्थानावर आहे.

 In the traditional universities' Pune 'first,' THE announces the yearly order | पारंपरिक विद्यापीठांत ‘पुणे’ पहिले, ‘टीएचई’कडून दर वर्षी क्रमवारी जाहीर

पारंपरिक विद्यापीठांत ‘पुणे’ पहिले, ‘टीएचई’कडून दर वर्षी क्रमवारी जाहीर

Next

पुणे - ‘द टाइम्स हायर एज्युकेशन’ (टीएचई) क्रमवारीमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पारंपरिक विद्यापीठांमध्ये देशात पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. तर, इतर विद्यापीठे व शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यापीठ संयुक्तपणे सहाव्या स्थानावर आहे. तसेच, जागतिक क्रमवारीत विद्यापीठाला ५०१ ते ६०० या गटात स्थान मिळाले आहे. विद्यापीठाने यंदा तब्बल २०० क्रमांकांनी झेप घेतली आहे.
जगातील विद्यापीठ व उच्च शिक्षण संस्थांचे त्यांच्या सर्व क्षेत्रांतील कामगिरीच्या आधारे ‘टीएचई’कडून दर वर्षी क्रमवारी जाहीर केली जाते. या संस्थेने २०१९साठीची क्रमवारी नुकतीच जाहीर केली. शिक्षण संस्थांसाठी ही क्रमवारी प्रतिष्ठेची मानली जाते. अध्यापन, संशोधन, ज्ञानप्रसार आणि आंतरराष्ट्रीय भान या चार निकषांवर विशेष भर दिला जातो. याशिवाय, इतर १३ महत्त्वाच्या निकषांच्या आधारे गुणांकन दिले जाते.
या क्रमवारीमध्ये पहिल्या एक हजार विद्यापीठांची नावे जाहीर केली जातात. यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ २०१६ पासून सहभागी होत आहे. मागील तीन वर्षे विद्यापीठाचा समावेश पहिल्या ६०१ ते ८०० विद्यापीठांच्या गटात होत होता. त्यात मोठी सुधारणा होऊन आता विद्यापीठ पहिल्या ५०१ ते ६०० विद्यापीठांच्या गटात आले आहे.
जागतिक क्रमवारीत सुधारणा झाल्याने देशपातळीवरही विद्यापीठ आघाडीवर आहे. पारंपरिक विद्यापीठांमध्ये विद्यापीठ देशात पहिल्या स्थानावर आहे. तर, सर्व संस्थांमध्ये संयुक्तपणे सहावे स्थान पटकावले आहे. विशेष म्हणजे वरच्या पाच संस्थांमध्ये बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ सायन्सेस, तीन आयआयटी आणि मैसूरच्या जेएसएस अ‍ॅकॅडमी आॅफ हायर एज्युकेशन अँड रीसर्च या वैद्यकीय विद्यापीठाचा समावेश आहे.
‘नॅशनल इन्स्टिट्युशलन रँकिंग फ्रेमवर्क’ने (एनआयआरएफ) नुकत्याच जाहीर केलेल्या क्रमवारीत विद्यापीठाचा नववा क्रमांक आला होता. आता विद्यापीठाने आणखी प्रगती केल्याचे ‘टाइम्स हायर एज्युकेशन’च्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. याच मूल्यांकनात देशातील पारंपरिक विद्यापीठांमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा २०१६मध्ये तिसरा, तर २०१७मध्ये दुसरा क्रमांक आला होता. २०१८मध्ये विद्यापीठाने संयुक्त पहिला क्रमांक पटकावला होता. आता पारंपरिक विद्यापीठांमध्ये पहिले स्थान पटकावले आहे.

अध्यापन, संशोधन आदी निकषांवर निर्णय
जागतिक क्रमवारीत एक महत्त्वाचा टप्पा ओलांडणे हे आव्हान असते. त्यापैकी एक आव्हान आम्ही पार केले आहे. आतापर्यंत ६०१ ते ८०० या गटातून आम्ही ५०१ ते ६०० विद्यापीठांच्या गटात पोहोचलो आहोत. आता पुढचा टप्पा पहिल्या ५०० विद्यापीठांच्या गटात पोहोचण्याचा असेल. आम्ही योग्य दिशेने काम करत आहोत, हे या गुणांकनावरून स्पष्ट झाले आहे. यामुळे आणखी जबाबदारीही वाढली आहे.
- डॉ. नितीन करमळकर,
कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

‘टीएचई’ने अध्यापन, संशोधन, आंतरराष्ट्रीय
दृष्टीकोन, सायटेशन, उद्योगांकडून उत्पन्न अशा
विविध निकषांच्या आधारे मुल्यमापन केले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला एकुण ३३.५
ते ३७ गुण मिळाले आहेत. अध्यापनामध्ये विद्यापीठ ३८.८ गुणांसह सातव्या क्रमांकावर राहिले.
संशोधनामध्ये विद्यापीठाला कमी गुण मिळाले
आहेत. देशात विद्यापीठ १७ व्या क्रमांकावर असून केवळ १५.४ गुण मिळाले आहेत. आंतरराष्ट्रीय दृष्टीकोन व उद्योगाकडून उत्पन्न या गटांमध्ये अनुक्रमे १७.६ व ३५.६ गुणांसह विद्यापीठ २३ व्या
स्थानावर राहिले.

देशातील ‘टॉप’ संस्था (कंसात जागतिक क्रमवारी)
१. इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ सायन्सेस, बंगळुरू (२५१-३००)
२. आयआयटी, इंदूर (३५१-४००)
३. आयआयटी, मुंबई (४०१-५००)
४. आयआयटी, रुरकी (४०१-५००)
५. जेएसएस अ‍ॅकॅडमी आॅफ हायर एज्युकेशन अँड रीसर्च
(४०१-५००)
६. आयआयटी, दिल्ली (५०१-६००)
७. आयआयटी, कानपूर (५०१-६००)
८. आयआयटी, खरगपूर (५०१-६००)
९. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (५०१-६००)

Web Title:  In the traditional universities' Pune 'first,' THE announces the yearly order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.