जलवाहिनीच्या कामामुळे एम्प्रेस गार्डन परिसरात वाहतूक बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:08 AM2021-06-27T04:08:08+5:302021-06-27T04:08:08+5:30
पुणे : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून जलवाहिनी टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे एम्प्रेस गार्डन चौक परिसरातील वाहतूक व्यवस्थेत ...
पुणे : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून जलवाहिनी टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे एम्प्रेस गार्डन चौक परिसरातील वाहतूक व्यवस्थेत बदल होणार आहेत. लालबहाद्दुर शास्त्री रस्त्यावरील लहान कालवा परिसरात जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. जलवाहिनीचे काम रविवारपर्यंत (दि. २७) सुरू राहणार आहे. पुणे-सोलापूर रस्त्यावरील भैरोबानाला चौकाकडून एम्प्रेस गार्डनकडे जाणारा रस्ता तसेच एम्प्रेस गार्डन चौकातून भैरोबानाला चौकाकडे जाणारा रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येईल. सोलापूर रस्त्याने पुणे स्टेशनकडे जाणाऱ्या वाहनांनी भैरोबानाला चौक, टर्फ क्लब चौक, अर्जुन रस्ता, रेसकोर्स मुख्य प्रवेशद्वारामार्गे इच्छितस्थळी जावे. घोरपडीकडून भैरोबा नाला चौकाकडे जाणाऱ्या वाहनांनी कटक मंडळाचा जकातनाका, रेसकोर्स प्रवेशद्वार, पाण्याची टाकी या मार्गाने वळून इच्छितस्थळी पोहोचावे. लुल्लानगर चौकातून सोलापूर रस्त्यावर येणाऱ्या वाहनांना तात्पुरत्या स्वरुपात भैरोबानाला चौकातून उजवीकडे वळण्यास परवानगी दिली आहे.
---