Shivjayanti: पुण्यात शिवजयंती मिरवणुकानिमित्त मध्य वस्तीतील वाहतुकीत बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 10:48 AM2024-03-28T10:48:48+5:302024-03-28T10:50:04+5:30
भवानी माता मंदिरापासून मिरवणुकीला सुरुवात होईल. ती नेहरू रोडने लक्ष्मी रोडला येईल. सोन्या मारुती चौकातून ती उजवीकडे वळून फडके हौद चौकात येतील...
पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरातील मध्य वस्तीत गुरुवारी मिरवणुका काढण्यात येणार आहेत. लक्ष्मी रोड, शिवाजी रोडवरून या मिरवणुका निघणार असून, या काळात गुरुवारी बदल करण्यात येणार असल्याचे पाेलिसांकडून सांगण्यात आले.
भवानी माता मंदिरापासून मिरवणुकीला सुरुवात होईल. ती नेहरू रोडने लक्ष्मी रोडला येईल. सोन्या मारुती चौकातून ती उजवीकडे वळून फडके हौद चौकात येतील. तेथून जिजामाता चौकातून फुटका बुरुज येथून शनिवारवाडा येथे येईल. शिवाजी पुलावरून पुढे एसएसपीएमएस येथील शिवाजी पुतळ्याजवळ मिरवणुकीची सांगता होईल.
या दरम्यान, नेहरू रोड, लक्ष्मी रोडवरील वाहतूक वळविण्यात येणार आहे. मिरवणूक लक्ष्मी रोडवरून सोन्या मारुती चौकातून उजवीकडे जाईपर्यंत लक्ष्मी रोडवरील वाहतूक संत कबीर चौकातून वळविण्यात येईल.
गणेश रोडवरील फडके हौद चौकाकडे जाणारी वाहतूक दारुवाला पूल चौकातून वळविण्यात येईल. मिरवणूक सुरू असताना बाजीराव रोडवरून शिवाजीनगरकडे जाणारी वाहतूक टिळक रोडने अलका टॉकीज चौक व पुढे फर्ग्युसन रोडने वळविण्यात येणार आहे.
अप्पा बळवंत चौक, जोगेश्वरी मंदिर चौक, बुधवार चौकाकडे जाणारी वाहतूक आवश्यकतेनुसार वळविण्यात येणार असल्याचे वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त रोहिदास पवार यांनी कळविले आहे.