पालखी सोहळ्यानिमित्त पुणे जिल्ह्यातील वाहतुकीत बदल; माहीत करून घ्या पर्यायी मार्ग

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2023 09:03 AM2023-06-08T09:03:32+5:302023-06-08T09:04:39+5:30

पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे...

Traffic changes in Pune city on the occasion of Palkhi festival; Know the alternative way | पालखी सोहळ्यानिमित्त पुणे जिल्ह्यातील वाहतुकीत बदल; माहीत करून घ्या पर्यायी मार्ग

पालखी सोहळ्यानिमित्त पुणे जिल्ह्यातील वाहतुकीत बदल; माहीत करून घ्या पर्यायी मार्ग

googlenewsNext

पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त पुणे जिल्ह्यात वाहतुकीत बदल केले आहेत. ते लक्षात घेऊन पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.

पुणे ग्रामीण जिल्ह्याच्या हद्दीतून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी पुणे- सासवड- लोणंद मार्गे पंढरपूर अशी जाते, तर संत तुकाराम महाराज पालखी पुणे ते सोलापूर मार्गाने रोटी घाटमार्गे बारामती- इंदापूर- अकलूज मार्गे पंढरपूरला जाते. या दोन्ही पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने या मार्गावरील वाहतुकीत बदल केले आहेत.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी १४ ते १८ जून या कालावधीत, तर संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी १५ जून ते २४ जून या कालावधीत पालखी मार्गावरील पालखी मुक्कामाच्या गावांमध्ये सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर असा असेल वाहतुकीत बदल...

- पुणे ते सासवड (सासवड मुक्काम) : १४ जूनच्या रात्री २ वाजेपासून ते १६ जूनच्या रात्री १२ वाजेपर्यंत पुण्याकडून सासवडकडे दिवे घाट व बोपदेव घाट मार्गे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहील. ही वाहतूक खडीमशीन चौक- कात्रज- कापूरहोळ मार्गे सुरू राहील. सासवड बाजूकडून येणारी सर्व वाहतूक गराडे-खेड शिवापूर मार्गे पुण्याकडे येईल.

- सासवड ते जेजुरी (जेजुरी मुक्कम) व जेजुरी ते वाल्हे (वाल्हे मुक्काम) : १६ जून रात्री २ वाजेपासून ते १७ जून रात्री १२ या कालावधीत पुणे येथून सासवड- जेजुरी- वाल्हे- नीराकडे, तसेच नीरा येथून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांनी झेंडेवाडी- पारगाव मेमाणे- सुपे- मोरगाव- नीरा या मार्गाचा वापर करावा.

- वाल्हे ते लोणंद (लोणंद मुक्काम) : १८ जून रोजी पहाटे २ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पुणे येथून सासवड- जेजुरी- वाल्हे- निराकडे, तसेच नीरा येथून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांनी सासवड- जेजुरी- मोरगाव या पर्यायी मार्गाचा वापर करावा.

- लोणंद येथून पुढे फलटण मार्गे : १६ ते १८ जून या कालावधीत फलटण- लोणंद येथून पुणे येथे येणारी, तसेच पुणे येथून फलटण- लोणंदकडे जाणारी वाहतूक शिरवळ मार्गे जाईल.

श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील पर्यायी मार्ग...

- लोणी काळभोर ते यवत (यवत मुक्काम) : १५ जून रोजी पहाटे २ ते रात्री १२ वाजेपर्यंत पुणे बाजूकडून सोलापूरकडे जाणारी वाहने वाघोली- केसनंद- राहू- पारगाव- चौफुला या मार्गाचा वापर करतील, तसेच सोलापूर बाजूकडून पुण्याकडे येणारी वाहतूक चौफुला- पारगाव- राहू- केसनंद- वाघोली या मार्गाचा वापर करतील.

- यवत ते वरवंड (वरवंड मुक्काम) : १६ जून रोजी पहाटे २ ते रात्री १२ वाजेपर्यंत पुणे बाजूकडून सोलापूरकडे जाणारी वाहने थेऊर फाटा- केसनंद- राहू- पारगाव- न्हावरे- काष्टी- दौंड- कुरकुंभ या मार्गे जातील. सोलापूर बाजूकडून येणारी वाहने कुरकुंभ- दौंड- काष्टी- न्हावरे- पारगाव- राहू- केसनंद- वाघोली या मार्गाचा वापर करतील.

- वरवंड ते उंडवडी (मुक्काम उंडवडी, ता. बारामती) : १७ जून रोजी पहाटे २ ते रात्री १२ वाजेपर्यंत पुणे बाजूकडून सोलापूरकडे जाणारी वाहने चौफुला- पारगाव- न्हावरे- काष्टी- दौंड- कुरकुंभ या मार्गाचा वापर करतील, तसेच सोलापूर बाजूकडून पुणे बाजूकडे येणारी वाहतूक कुरकुंभ- दौंड- काष्टी- न्हावरे- पारगाव- चौफुला- वाघोली- पुणे या मार्गाचा वापर करतील.

- उंडवडी ते बारामती (बारामती मुक्काम) : १८ जून रोजी पहाटे २ ते रात्री १२ वाजेपर्यंत बारामती ते पाटस व बारामती ते दौंड हे रस्ते बंद राहतील. ही वाहतूक भिगवन मार्गे बारामतीला जाईल. बारामतीकडून येताना भिगवन मार्गे सोलापूर- पुणे महामार्गावर येईल.

- बारामती ते सणसर (सणसर मुक्काम) : १९ जून रोजी पहाटे २ ते रात्री १२ वाजेपर्यंत जंक्शन ते बारामती हा रस्ता वाहतुकीसाठी बंद राहील. वालचंदनगर व इंदापूरकडून येणारी वाहतूक जंक्शन येथून कळस मार्गे बारामती- आष्टी वळविण्यात येईल. बारामतीकडून येताना भिगवन कळस जंक्शनकडे जाईल.

- सणसर ते अंथुर्णे (अंथुर्णे मुक्काम), तसेच अंथुर्णे ते निमगाव केतकी (निमगाव केतकी मुक्काम) : २० जून रोजी पहाटे २ ते २१ जून रोजी रात्री १२ वाजेपर्यंत व २१ जून रोजी पहाटे २ ते २२ जून रोजी रात्री १२ वाजेपर्यंत बारामतीकडून इंदापूरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने बारामती- कळंब- बावडा- इंदापूर या मार्गे किंवा बारामती- भिगवण- इंदापूर या मार्गे जातील. इंदापूरकडून बारामतीकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने इंदापूर- बावडा- कळंब- बारामती या मार्गे किंवा इंदापूर- भिगवण- बारामती या मार्गे जातील.

- निमगाव केतकी ते इंदापूर (इंदापूर मुक्काम) : २२ जून रोजी पहाटे २ ते रात्री १२ वाजेपर्यंत निमगाव केतकीकडून इंदापूरकडे जाणारी वाहतूक बंद राहील. इंदापूरकडून बारामतीकडे जाणारी वाहतूक लोणी देवकर- कळस - जंक्शन मार्गे किंवा लोणी- देवकर- भिगवण मार्गे बारामतीकडे जाईल.

- इंदापूर : २३ जून रोजी पहाटे ४ ते रात्री ८ वाजेपर्यंत अकलूजकडून बारामतीकडे जाणारी वाहतूक ही अकलूज- बावडा- नातेपुते मार्गे जाईल. अकलूजकडून बारामती व पुण्याकडे जाण्याकरिता इंदापूर मुख्य हायवेचा वापर करावा. इंदापूर शहरातील जुना पुणे- सोलापूर मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात येईल. त्यावरील वाहतूक मालोजीराजे चौक ते महात्मा फुले चौक, अशी बायपासने वळविण्यात येईल.

- इंदापूर ते सराटी (सराटी मुक्काम) : २४ जून रोजी पहाटे २ ते रात्री १२ वाजेपर्यंत व २५ जून रोजी पहाटे २ ते दुपारी १२ वाजेपर्यंत इंदापूर ते अकलूज रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद राहील. या मार्गावरील वाहतूक इंदापूर- हिंगणगाव- टेंभुर्णी- गणेशगाव- माळीनगर- अकलूज या मार्गे जाईल, तसेच अकलूज ते इंदापूर या मार्गावरील वाहने अकलूज- नातेपुते- वालचंदनगर- जंक्शन- भिगवण या मार्गे जातील.

Web Title: Traffic changes in Pune city on the occasion of Palkhi festival; Know the alternative way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.