चांदणी चौकातील वाहतूककोंडी फुटणार
By admin | Published: May 12, 2017 05:27 AM2017-05-12T05:27:44+5:302017-05-12T05:27:44+5:30
चांदणी चौकातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाअंतर्गत सर्व्हिस रोड आणि उड्डाणपुलाचे काम करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : चांदणी चौकातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाअंतर्गत सर्व्हिस रोड आणि उड्डाणपुलाचे काम करण्यात येणार आहे. यासाठी करावे लागणारे भूसंपादन, २०५ अन्वये आखावे लागणारे रस्ते आणि या प्रकल्पामध्ये बाधीत होणाऱ्या जागामालकांची यादी एका आठवड्यात सादर करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत, अशी माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
महापौर मुक्ता टिळक यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी चांदणी चौकातील सर्व्हिस रस्ते आणि उड्डाण पुलांच्या कामानिमित्त आढावा घेण्यात आला. यावेळी आमदार मेधा कुलकर्णी, भीमराव तापकीर, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्यासह महापलिका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते.
मुक्ता टिळक यांनी सांगितले, की या प्रकल्पाचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या कामासाठी महापालिका भूसंपादन करून देणार आहे. तसेच काही सर्व्हिस रस्ते नव्याने आखावे लागणार आहेत. यामुळे काही खासगी जागा बाधीत होणार आहेत. या बाधीत जागा आणि मालकांची यादी तयार करण्यात यावी. सिटी सर्वे आणि महापालिकेने संयुक्तरित्या जागा मोजणी करून पुढील आठवड्यात अहवाल तयार करून पुन्हा बैठक घेण्यात येणार आहे.