मंचर शहरातील वाहतुकीचा ताण होणार कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:17 AM2021-02-18T04:17:56+5:302021-02-18T04:17:56+5:30

--------------- मंचर: खेड-सिन्नर रस्त्याच्या मंचर येथील बाह्यवळण रस्त्याचे काम सुरू आहे. मागील चार महिन्यांत ३० टक्के काम झाले असून ...

Traffic congestion in the city of Manchar will be reduced | मंचर शहरातील वाहतुकीचा ताण होणार कमी

मंचर शहरातील वाहतुकीचा ताण होणार कमी

Next

---------------

मंचर: खेड-सिन्नर रस्त्याच्या मंचर येथील बाह्यवळण रस्त्याचे काम सुरू आहे. मागील चार महिन्यांत ३० टक्के काम झाले असून या वर्षअखेर तांबडेमळा ते निघोटवाडी फाटा हे काम पूर्ण होईल. त्यामुळे मंचर शहरातील वाहतूक बाह्यवळण रस्त्याने जाऊन शहरातील वाहतुकीचा ताण कमी होणार आहे. पुणे शहरातून श्रीक्षेत्र भीमाशंकरकडे जाणारी वाहने नवीन रस्त्याने जाणार असल्यामुळे मंचर शहरातील रहदारीचा मार्ग मोकळा राहणार आहे.

खेड-सिन्नर रस्त्याचे काम अनेक ठिकाणी पूर्ण झाले आहे. मात्र, येथील बाह्यवळण रस्त्याची कामे रखडली होती, ती आता सुरू झाली आहेत. तांबडेमळा ते एकलहरे या नऊ किलोमीटर अंतराच्या बायपास रस्त्याच्या कामाला वेग आला आहे. या रस्त्याचे काम दिवस-रात्र सुरू असून लवकरच मंचर शहरातून जाणारा पुणे-नाशिक महामार्गावरील व मंचर-भीमाशंकर रस्त्यावरील वाहतुकीचा खोळंबा कमी होणार आहे.

२०१२ मध्ये शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रयत्नांतून खेड-सिन्नर महामार्गाला हिरवा कंदील मिळाला होता. त्या वेळेस एका कंपनीला काम मिळाले होते. परंतु, मध्यंतरीच्या काळात न्यायालयात वाद चालू असल्यामुळे काम बंद पडले होते. आढळराव पाटील खासदार नसताना देखील या रस्त्यासाठी प्रयत्न करून केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याशी वारंवार चर्चा करून उर्वरित काम चालू करायला परवानगी मिळाली. ऑक्टोबर २०२० मध्ये एका खासगी कंपनीला तांबडेमळा ते एकलहरे या नऊ किलोमीटरचे काम मिळाले आहे. या कामात प्रामुख्याने पाच उड्डाणपूल, चार छोटे पूल व दोन सर्कल असणार आहे.या नऊ किलोमीटर रस्त्याला कोणताही टोल वाहनांना भरावा लागणार नाही.मागील चार महिन्यांपासून काम प्रगतिपथावर असून २०२१ अखेर मंचर ते भीमाशंकर रस्त्यावर असणारे निघोटवाडी फाटापर्यंत काम पूर्ण होणार आहे. अशी माहिती देण्यात आली आहे.

--

चौकट

रस्त्याच्या कामाबाबत बोलताना शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी सांगितले की, मी खासदार नसताना देखील शासन दरबारी अधिकारी, ठेकेदार यांच्याकडे पाठपुरावा केला. परिणामी, कामाला गती मिळाल्याने मंचर शहर व पुणे-नाशिक महामार्गावरील होणारी वाहतूककोंडी कमी होणार आहे. रस्त्याबाबत माझा सातत्याने पाठपुरावा आहे, त्यामुळे लवकर नागरिकांसाठी हा रस्ता उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे.

- शिवाजीराव आढळराव-पाटील,

शिवसेना नेते,

Web Title: Traffic congestion in the city of Manchar will be reduced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.