सलग सुट्यांमुळे ‘एक्स्प्रेस वे’वर वाहतूक कोंडी; खालापूर टोल नाका, खंडाळा घाटात वाहनांच्या रांगा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2023 06:39 PM2023-12-23T18:39:49+5:302023-12-23T18:40:41+5:30
खंडाळा घाटाचा परिसर चढणीचा असल्याने अनेक वाहने गरम होऊन बंद पडत असल्याने या कोंडीत भर पडत होती....
लोणावळा (पुणे) : शनिवार व रविवारला जोडून नाताळची सुट्टी आल्याने सलग सुट्यांचा आनंद घेण्यासाठी मुंबईकर मोठ्या संख्येने घराबाहेर पडल्याने शनिवारी सकाळपासून मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडी झाली आहे. पुण्याकडे येणाऱ्या मार्गावर खालापूर टोल नाका व खंडाळा घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अतिशय संथ गतीने वाहने पुढे सरकत होती. खंडाळा घाटाचा परिसर चढणीचा असल्याने अनेक वाहने गरम होऊन बंद पडत असल्याने या कोंडीत भर पडत होती.
बोरघाट व खंडाळा महामार्ग पोलिस, महाराष्ट्र सुरक्षा बलचे कर्मचारी, ‘अपघातग्रस्तांच्या मदतीला’ या संस्थेचे सदस्य वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते. खंडाळा बोगद्याजवळ मुंबईच्या दिशेने जाणारी वाहने काही काळ थांबवून धरत पुण्याच्या दिशेने येणाऱ्या वाहनांसाठी सर्व सहा लेन खुल्या केल्या जात होत्या. दरम्यानच्या काळात दोन्ही लेनवर वाहतूक कोंडी होत होती.
लोणावळा शहरातही मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले आहेत. लोणावळ्यातील हॉटेल व बंगलो फुल्ल झाले असून, पर्यटकांच्या स्वागतासाठी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर होणारी कोंडी सोडविण्यासाठी लोणावळा पोलिस प्रयत्न करत आहेत. मात्र, वाहनांच्या संख्येपुढे रस्ते तोकडे पडत असल्याने कोंडी होत असल्याचे चित्र आहे. पुढील संपूर्ण आठवडाभर लोणावळ्यात गर्दीचे हेच चित्र पाहायला मिळणार आहे.