Pune News | वडगाव-तळेगाव-चाकण-उर्से फाट्यावर वाहतूक कोंडी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 09:32 PM2022-11-17T21:32:50+5:302022-11-17T21:35:01+5:30
वाहतूक सुरळीत करण्यासाठी दररोज पोलिसांना मोठी कसरत करावी लागत आहे...
वडगाव मावळ (पुणे) : वडगाव-तळेगाव-चाकण-उर्से फाट्यावर उड्डाण पूल नाही अथवा सिग्नल नसल्यामुळे या चौकात गेल्या वर्षभरापासून दररोज मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी दररोज पोलिसांना मोठी कसरत करावी लागत आहे.
पुणे ते मुंबई, मुंबई ते पुणे, चाकण तसेच उर्से द्रुतगती महामार्गाकडे येणारी-जाणारी वाहने एकाच वेळी या चौकात येतात. या ठिकाणी उड्डाण पूल नाही अथवा सिग्नल नाही. त्यामुळे दररोज वाहतूक ठप्प होते. वाहतूक सुरळीत करण्यासाठी याठिकाणी पोलिस चौकी करण्यात आली आहे. परंतु वाहनांची संख्या वाढल्याने पोलिस यंत्रणेवर कामाचा ताणदेखील वाढला आहे.
दररोज सायंकाळी सहानंतर याठिकाणी एक ते दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. सायंकाळी सातपर्यंत चाकण बाजूकडे जाणारे कंटेनर बंद असतात. सातनंतर ते सोडले जातात. यावेळी सर्व बाजूकडून येणारी वाहने याठिकाणी आल्यावर तासन्तास रहदारी ठप्प होते. उड्डाण पूल होईपर्यंत या चौकात सिग्नल बसवणे अत्यंत आवश्यक आहे.