मेट्रोकामामुळे वाहतूककोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 02:35 AM2018-08-26T02:35:02+5:302018-08-26T02:35:21+5:30
कर्वे रस्त्यावर मेट्रोचे काम सुरू असल्यामुळे लोक पर्यायी मार्गांचा शोध घेऊन त्याचा वापर करतात व त्यातूनच गल्ली बोळात वाहतूककोंडी होते,
कर्वेनगर : कर्वे रस्त्यावर मेट्रोचे काम सुरू असल्यामुळे लोक पर्यायी मार्गांचा शोध घेऊन त्याचा वापर करतात व त्यातूनच गल्ली बोळात वाहतूककोंडी होते, या रोजच्या वाहतूककोंडीने नागरिक त्रस्त झाले असून, त्यावर उपाययोजना करण्यासाठी आज विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांसह पाहणी व प्रत्यक्ष निर्णय अशा स्वरूपाची आखणी करण्यात आली.
या वेळी मंजूश्री खर्डेकर, नगरसेवक दीपक पोटे, सहाय्यक पोलीस आयुक्त वाहतूक प्रभाकर ढमाले, सहायक पोलीस आयुक्त सावंत, पोलीस निरीक्षक प्रतिभा जोशी, मनपाच्या पथ विभागाचे मुकुंद शिंदे, राजेश फटाले, भाजपा शहर उपाध्यक्ष संदीप खर्डेकर, सामाजिक कार्यकर्ते संजय देशपांडे, महेश पोटे, शिवाजी पाडळे व अन्य उपस्थित होते.
या वेळी विविध उपाययोजनांवर सांगोपांग चर्चा करून निर्णय घेण्यात आल्याचे नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी सांगितले.
कोंडी टाळण्यासाठी पर्यायी उपाय योजना
म्हात्रे पुलावरून तसेच मेहेंदळे गॅरेज चौकातून व हॉटेल निसर्गच्या गल्लीतून येणाºया वाहनांना पाडळे पॅलेस चौकातून उजवीकडे वळण्यास म्हणजेच खिलारे पथावर जाण्यासाठी बंदी करण्यात येणार असून या मार्गांवरून येणाºया वाहनचालकांनी नळस्टॉप चौकातून यू टर्न मारून खिलारे पथावर यावे किंवा नळस्टॉपवरून कर्वे रस्ता मार्गे मार्गक्रमण करावे. त्यासाठी नळस्टॉप चौकातील सिग्नलची वेळ वाढविण्यास ही तत्त्वत: मान्यता देण्यात आली. (हा बदल प्रायोगिक तत्त्वावर करण्यात येणार असून, त्यातून वाहतूककोंडी सुटल्यास कायमस्वरूपी हा बदल करण्यात येईल.)
पाडळे पॅलेस चौकातील सर्कल लहान करणे. तसेच पाडळे पॅलेस ते गरवारे कॉलेज रस्तारुंदीकरण करणे व हा संपूर्ण रस्ता नो पार्किंग, विनाथांबा क्षेत्र करणे.
या रस्त्यावरील हातगाडीवाले, फेरीवाले, पथारीवाले यांचे युद्धपातळीवर पुनर्वसन करणे.
नळस्टॉप चौकातील शौकिन पानसमोर नो पार्किंग करणे.
कर्वे रस्त्यावरील पदपथांचा आकार लहान करणे जेणेकरून वाहनांसाठी एक जादा लेन उपलब्ध होईल.
उपाययोजनांबाबत अधिकारी व प्रभागाचे चार ही नगरसेवकांचे एकमत झाले असून, मनपाच्या संबंधित खात्यांना सोमवारी यासंबंधीचे पत्र दिले जाईल व त्यास आठवड्याभरात पोलीस व अन्य खात्यांची मान्यता मिळवून अंमलबजावणी केली जाईल असे नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी स्पष्ट केले.
खिलारे रस्त्यावरील वाहतूककोंडीवर उपाय : सर्व खात्यांचा विविध पर्यायांवर विचार सुरू