Pune: वाहतूक दंडाचे पैसे गेले दुकानदाराच्या क्यूआर कोडवर! वाहतूक पोलिस निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 01:39 PM2023-12-13T13:39:59+5:302023-12-13T13:40:26+5:30
ही घटना नळस्टॉप चौकात ४ डिसेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता घडली होती....
पुणे : दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेला अडवून तिला दुकानदाराला फोन पेवर पैसे पाठवून त्याच्याकडून पैसे घेणे वाहतूक पोलिसाला महाग पडले असून पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी त्याला निलंबित केले आहे. संग्राम लक्ष्मण पवार हे या पोलिस शिपायाचे नाव असून सध्या तो कोथरुड वाहतूक शाखेत कार्यरत होता. ही घटना नळस्टॉप चौकात ४ डिसेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता घडली होती.
संग्राम पवार हा नळस्टॉप चौकात नेमणुकीला होता. दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेला थांबविले. तिच्याकडे एनओसी मागून १० हजार रुपये दंड होईल, असे सांगितले. या महिलेने दंड भरण्यास असमर्थता दाखविल्यावर तिच्याकडे १ हजार रुपयांची मागणी केली. त्यावेळी तिने काही कमी करा, असे म्हटल्यावर त्याने ५०० रुपये मागितले. तिने फोन पेने पैसे घेण्यास सांगितले. तेव्हा त्याने समोरील न्यू इंद्रप्रस्थ मिनी मार्केटमधील क्यूआर कोड वर ५०० रुपये स्कॅन करुन कॅश आणून देण्यास सांगितले. त्या दुकानात गेल्यावर त्या दुकानदाराने ५२० रुपये फोन पेवर स्कॅन करावे लागतील, असे सांगितले.
त्याप्रमाणे दुकानातील फोन पेवर या महिलेने ५२० रुपये दिले आणि दुकानदाराकडून ५०० रुपये घेऊन ते संग्राम पवार याला दिले. याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी संग्राम पवार याला निलंबित केले.