Pune News: खडी मशीन चौकामधून कात्रजकडे जाणारी वाहतूक आता वळविणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 09:58 AM2024-01-16T09:58:39+5:302024-01-16T10:00:01+5:30
पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी ही माहिती दिली....
पुणे : कान्हा हॉटेल चौकामधील ग्रेड सेप्रेटरचे काम करण्यासाठी खडी मशीन चौकामधून कात्रजकडे जाणारी वाहतूक शनिवार (दि. २०)पासून पर्यायी रस्त्याने एसबीआयपर्यंत वळवण्यात येणार आहे. पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी ही माहिती दिली.
महापालिका प्रशासनाकडून कान्हा हॉटले चौकात ग्रेड सेप्रेटरचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी येथील वाहतूक बंद करावी लागणार आहे. याबाबत अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्यासह पथ विभागाने अधिकारी यांनी येथील कामाची पाहणी केली. खडी मशीन चौकापासून पर्यायी रस्ता तयार केला आहे. या रस्त्यावर काही ठिकाणी पथदिवे आणि गतिरोधक बसविण्याच्या सूचना दिल्या आहेत. ही सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर वाहतूक वळवण्यात येईल, असेही ढाकणे यांनी सांगितले.
रस्ता ५० मीटरचाच करणार
कोंढवा येथील खडी मशीन चौक ते मंतरवाडीदरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गावरील उंड्री, पिसोळी, हांडेवाडी, देवाची उरूळी आणि मंतरवाडीपर्यंतचा रस्ता ५० मीटर रुंद गृहीत धरूनच रस्त्याच्या दुतर्फा बांधकामांना परवानगी द्यावी, असे पत्र महापालिकेच्या बांधकाम विभागाला देण्यात येईल. सद्य:स्थितीत हा रस्ता २० मीटर रुंद असून उंड्री येथील सुमारे २७० मीटर रस्ता हा ८ मीटरच रुंद आहे. या ठिकाणी भूसंपादन करून हा रस्ता २० मीटर रुंदीचा करून घेण्यात येईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी दिली.