Pune | कात्रज-काेंढवा रस्त्यावर १५ दिवसांत हाेणार वाहतूक सुधारणा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 11:52 AM2023-02-16T11:52:12+5:302023-02-16T11:53:26+5:30
रस्त्याची पाहणी झाली; पुढे काय?...
पुणे : भूसंपादनाअभावी कात्रज - कोंढवा रस्त्याचे रुंदीकरण रखडले आहे. पण, अस्तित्त्वातील रस्त्यावर वाहतूक सुधारणा व इतर आवश्यक कामे महापालिकेने वाहतूक पोलिसांच्या मदतीने सुरू केली असून, ती १५ दिवसांत पूर्ण केली जाणार आहेत.
सोलापूर, सासवड या भागातून येणाऱ्या अवजड वाहनांना मुंबईला ये-जा करण्यासाठी पुणे शहरातून कात्रज - कोंढवा रस्त्याचा वापर करावा लागतो. त्यामुळे या रस्त्यावर कायम अवजड वाहनांची वाहतूक असते. हा सुमारे ३ किलोमीटरचा रस्ता ८४ मीटर रुंद करण्यात येणार होता. चार वर्षांपूर्वी त्याचे भूमिपूजनही झाले; पण जागा ताब्यात नसल्याने हा प्रकल्प अर्धवट राहिला आहे. ८४ मीटरचा रस्ता करण्यासाठी भूसंपादनासाठी सुमारे ७०० कोटी रुपये खर्च येणार होता. तेवढे पैसे महापालिकेकडे नाहीत. त्यामुळे ५० मीटरचा रस्ता करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी जागामालकांना नुकसानभरपाई देण्यासाठी २०० कोटी रुपये मिळणार आहेत. पण, ही प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. रुंदीकरणाचा प्रकल्प पूर्ण होण्यास वेळ लागणार असल्याने सध्या अस्तित्त्वात असलेल्या रस्त्यावर सुधारणा करण्यासाठी महापालिकेने सुरुवात केली आहे.
रस्त्याची पाहणी झाली; पुढे काय?
अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी कात्रज - कोंढवा रस्त्याची पाहणी केली. त्यामध्ये तातडीच्या सुधारणा करण्यासाठी वाहतुकीत बदल करण्याच्या दृष्टीने चर्चा करण्यात आली. त्यातून काही महत्त्वाचे बदल करण्यात येणार आहेत.
- शत्रुंजय मंदिर येथे ग्रेड सेक्टरचे काम पूर्ण करण्यासाठी वाहतूक वळवली जाणार आहे.
- कात्रज - कोंढवा रस्त्यावर अनेक गल्ल्या मुख्य रस्त्याला जोडल्या गेल्या आहेत. या गल्ल्यांचे पंक्चर बंद करून तेथे दुभाजक टाकले जाणार आहेत.
- अवजड वाहनांना अडथळा हाेऊ नये आणि वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी गाड्यांना वळसा घेण्यासाठी प्रत्येक २०० मीटरवर सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
- काेंडी दूर करण्याच्या हेतूने रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या साईडपट्ट्यांवर डांबरीकरण करून रस्ता मोठा करण्यात येणार आहे.