पुणे महापालिकेचा अजब कारभार ; भर रहदारीच्या वेळी लावले बाेलार्ड
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2019 05:26 PM2019-07-26T17:26:07+5:302019-07-26T17:27:23+5:30
भिडे पुलावर चारचाकींची वाहतूक राेखण्यासाठी बाेनार्ड दुपारी रहदारीच्या वेळी बसविण्यात आल्याने भिडे पुलावर गुरुवारी माेठी वाहतूक काेंडी झाली हाेती.
पुणे : पुणे महानगरपालिकेच्या अजब कारभाराचा अनुभव गुरुवारी पुणेकरांना आला. डेक्कन आणि पेठांना जाेडणाऱ्या भिडे पुलावर चारचाकी वाहने जावू नयेत म्हणून बाेलार्ड लावण्यात येत हाेते. परंतु हे काम भर रहदारीच्यावेळी दुपारच्या सुमारास करण्यात आल्याने पुणेकरांना वाहतूक काेंडीत अडकून पडावे लागले. त्यामुळे वाहतूक काेंडीतून सुटका हाेण्यासाठी करण्यात येणाऱ्या कामामुळेच वाहतूक काेंडी झाल्याचा अनुभव गुरुवारी पुणेकरांना आला.
बाबा भिडे पुल हा पुण्यातील एक प्रसिद्ध पुल आहे. या पुलावरुन दरराेज माेठी वाहतूक हाेत असते. हा पूल अरुंद असल्याने या पुलावरुन सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत चारचाकी वाहनांना जाण्यास बंदी आहे. परंतु चारचाकी वाहनचालकांकडून या नियमाचे सर्रास उल्लंघन करण्यात येत हाेते. त्यामुळे या पुलावर बाेलार्ड बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. वस्तूतः बाेलार्ड बसविण्याचे काम रात्रीच्यावेळी रहदारी नसताना करणे अपेक्षित हाेते. परंतु हे काम गुरुवारी भर दुपारी हाती घेण्यात आल्याने पुलावर माेठी वाहतूक काेंडी झाली हाेती. त्यातच काेणी वाहतूक कर्मचारी वाहतूक नियमन करण्यास नसल्याने या वाहतूक काेंडीत भरच पडली.
दरम्यान आता महापालिकेकडून बाेनार्ड बसविण्यात आल्याने चारचाकींना या पुलावरुन जाता येणार नाही. त्यामुळे चारचाकी चालकांना डेक्कनवरुन पेठांमध्ये जाण्यासाठी लकडी पुलाचाच वापर करावा लागणार आहे.