'पुणे शहरातील वाहतूककोंडी मेट्रो अन् ठेकेदारांमुळे'; अधिकाऱ्यांचा जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2022 12:04 AM2022-11-05T00:04:55+5:302022-11-05T11:00:01+5:30
रस्त्यांची व पुलांची कामे करणाऱ्या ठेकेदारांना दंड आकारण्याचा निर्णय...
पुणे : शहरातील वाहतूककोंडीवरून महापालिका व पोलिसांमध्ये ‘तू-तू मैं-मैं’ सुरू आहे. आता या कोंडीला मेट्रो प्रकल्पाची तसेच इतर रस्त्यांची सुरू असलेली कामे जबाबदार असल्याचा निष्कर्ष काढून महापालिका आयुक्त व पोलीस आयुक्तांनी महामेट्रो, पीएमआरडीए मेट्रो तसेच रस्त्यांची व पुलांची कामे करणाऱ्या ठेकेदारांना दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या सर्वांना नोटिसा बजावल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
वाहतूककोंडीवरून सर्वच स्तरातून टीका सुरू झाल्यानंतर पोलीस आणि महापालिका प्रशासनामध्ये एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याची स्पर्धा सुरू झाली. आता दोघेही एकत्र येऊन ही जबाबदारी शहरातील दोन्ही मेट्रोची कामे व ठेकेदारांची असल्याचे म्हणत आहेत.
पालकमंत्र्यांची गंभीर दखल
पाऊस थांबताच पालिका प्रशासनाने खड्ड्यांत गेलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निविदा प्रक्रिया राबविली. विविध संस्थांच्या माध्यमातून ८१५ ट्रॅफिक वॉर्डनही उपलब्ध करून देण्यात आले. तरीही ऐन सणांच्या काळात शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत होती. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दखल घेत उपाययोजना करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले होते.
त्यामुळे महापालिका व पोलीस यांच्यासह सर्वच यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या. आज (शुक्रवारी) दोन्ही आयुक्तांनी शहरभर वाहतूककोंडी होणाऱ्या रस्त्यांची संयुक्त पाहणी केली. कर्वे रस्ता, नगर रस्ता, विद्यापीठ रस्ता, बाणेर रस्ता, खराडी, जेल रोड, गणेश खिंड रस्त्यावरील गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक, पुणे विद्यापीठ चौक, बाणेर, चांदणी चौक, नवले पूल आणि सिंहगड रस्ता या ठिकाणी त्यांनी पाहणी केली. या सर्व ठिकाणी मेट्रोचे काम सुरू आहे. अनावश्यक बॅरिकेडिंग करून ठेकेदारांनी रस्ते अरुंद केल्याचा निष्कर्ष या पाहणीतून काढण्यात आला.
दौऱ्याआधी रस्ते झाले मोकळे
दोन्ही आयुक्तांचा शुक्रवारी हा संयुक्त दौरा होणार असल्याने शहरातील बहुतांश गर्दीच्या रस्त्यांवर वाहतूक आणि पोलीस ठाण्यांतील पोलीस व महापालिकेच्या अतिक्रमण विभागाची पथके दिसून आली. यंत्रणेच्या रस्त्यांवरील अस्तित्वामुळे दिवसभरात शहरातील बहुतांश रस्ते कोंडीमुक्त झाल्याचे पाहायला मिळाले.
‘ऑन द स्पॉट’ सूचना
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गणेशखिंड रस्त्यावर दुमजली उड्डाणपुलासाठी पायलिंगचे काम सुरू होईपर्यंत विद्यापीठ चौकातून जवाहर चौकात यू टर्न घेऊन सेनापती बापट रस्त्याकडे जाण्याचा रस्ता खुला करण्याची सूचना पाहणीदरम्यान केली.
महापालिकेचे मुख्य प्रकल्प अभियंता श्रीनिवास बोनाला, पथ विभागाचे प्रमुख व्ही.जी. कुलकर्णी, अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप, वाहतूक पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांच्यासह अन्य अधिकारी पाहणीच्या वेळी उपस्थित होते.
या आहेत सूचना
- बाणेर रस्त्यावर मेट्रोने पिलर उभारणीचे काम पूर्ण केले आहे. तेथील बॅरिकेड काढून टाकावेत.
- सेनापती बापट रस्ता ते पाषाण रस्त्याला जोडणारा मॉडर्न हायस्कूलमधून हलक्या वाहनांसाठी पर्यायी रस्ता १५ डिसेंबरपर्यंत पूर्ण करावा.
- मेट्रो कामाच्या वाहनांव्यतिरिक्त अन्य खासगी वाहने, बस बॅरिकेड्समध्ये उभी करू नयेत.
- बॅरिकेडिंग केलेल्या रस्त्याच्या कडेला वाहने उभी करण्यास मनाई करून नियम मोडणाऱ्या वाहनांवर कारवाई करावी.
- चांदणी चौकातील सेवा रस्त्याचे काम व अन्य २ उड्डाणपूल सेवा रस्त्याचे काम पुढील १० दिवसांत पूर्ण करावे. तसेच चांदणी चौकातील अन्य काम पुढील सहा महिन्यांत पूर्ण करावे.
- सिंहगड रस्त्यावरील अनधिकृत पार्किंग व अतिक्रमणे काढावीत.
- काम बंद असतानाही बॅरिकेड्स लावल्याचे आढळल्यास ठेकेदारांवर कारवाई करावी.