पावसाने केली पुणेकरांची '' कोंडी '' : प्रशासन, मेट्रो आणि खड्ड्यांचा फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2019 01:50 PM2019-07-09T13:50:55+5:302019-07-09T14:12:53+5:30
शहरामध्ये गेल्या आठ-दहा दिवसांपासून संततधार पाऊस पडत आहे.
सुषमा नेहरकर - राजानंद मोरे
पुणे : पावसामुळे शहरातील बहुतेक सर्व मुख्य रस्त्यांसह गल्लीबोळांमध्ये पडलेले प्रचंड खड्डे... पावसाची मोठी सर येऊ गेल्यानंतर रस्त्यांना येणाऱ्या ओढ्या-नाल्याचे स्वरुप.... खड्ड्यांमुळे रस्त्यांवर जगोजागी साठलेले पाण्याची डबकी...सिग्नल बंद पडल्याने उडालेला गोंधळ, मेट्रोचे काम सुरु असलेल्या रस्त्यांवर उडालेला नियोजनाचा बोजवारा... वाहतूक पोलिसांची अनुपस्थिती यामुळे सोमवारी संपूर्ण शहरामध्ये प्रचंड वाहतूक कोंडी झाली. या वाहतूक कोंडीमुळे शहरातील बहुतेक सर्व प्रमुख रस्त्यांवर, उपनगरांतील रस्ते, गल्लीबोळांमध्ये वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. या वाहतूक कोंडींतून मार्ग काढताना पुणेकरांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागल्याचे चित्र सर्वत्र दिसत होते.
शहरामध्ये गेल्या आठ-दहा दिवसांपासून संततधार पाऊस पडत आहे. शहरामध्ये पडलेल्या या पहिल्याच पावसामध्ये बहुतेक सर्व रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यात रविवारी रात्री पासून शहरातील पावसाने चांगलाच जोर धरला. सोमवारी देखील सकाळ पाऊन अधून-मधून चांगल्या जोरदार सरी येऊन जात होत्या. यामुळे नेहमीपेक्षा शहरातील रस्त्यांवरील चार चाकी वाहनांची संख्या वाढली होती. त्यात रस्त्यांवर पडलेले खड्डे, अनेक ठिकाणी असखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साठल्याने वाहतुकीचा चांगला खोळंबा झाला होता. याशिवाय पावसामुळे अनेक प्रमुख रस्त्यांवरील सिग्नल बंद पडल्याने कोंडीत अधिकच भर पडत होती.
शहराच्या मध्यवस्तीसह सर्व प्रमुख कर्वे रस्ता, सेनापती बापट रस्ता, फुर्ग्युसन रस्ता, आपटे रस्ता, टिळक रोड, बाजीराव रस्ता, विद्यापीठ रोड, शंकरशेठ रस्ता, हडपसर, सोलापूर रस्ता, सिंहगड रोड, कात्रज-कोंढवा रस्ता, बाणेर, भागातील सर्वच रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. यामुळे मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाल्याने पुणेकरांनी मुख्य रस्त्यांच्या लगत असलेल्या लहान-मोठ्या व गल्लीबोळामधून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. यामुळे गल्लीबोळांमध्ये देखील वाहतूक कोंडी झाली. यामुळे सोमवारी नेहमी प्रमाणे सकाळी आॅफीस व अन्य कोणत्याही कामांसाठी घराबाहेर पडलेल पुणेकरांना आपल्या इच्छास्थळी पोहचण्यासाठी नेहमीच्या वेळेपेक्षा तब्बल एक-दीड-दोन तास उशीर झाला.
----------------
मेट्रोच्या कामामुळे शहरातील रस्त्यांचा श्वास गुदमरतोय
सध्या शहरामध्ये प्रमुख्याने कर्वे रस्ता, स्वरगेट, शिवाजीनगर या भागात मेट्रोचे काम सुरु आहे. यामुळे अगोदरच रस्ते प्रचंड अरुंद झाले आहेत. त्यात पावसामुळे या रस्त्यांवर पडलेले प्रचंड खड्डे, वाहतूक नियोजनाकडे मेट्रो व महापालिका प्रशासनाने केलेले दुर्लक्ष, काम सुरु असलेल्या रस्त्यांवर पार्किंग करण्यात आलेली वाहने यामुळे या रस्त्यांवर वाहने चालविताना पुणेकरांना मोठे दिव्य पार पाडावे लागत आहे.
-----------------
ड्रेनेज व्हॉअरफ्लो होऊन दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यांवर
महापालिका आयुक्त सौरभ राव यांनीपावसाळ्यापूर्वी कामे शंभर टक्के पूर्ण केल्याचा दावा केला होता. यामध्ये पावसाळी गटारे व ड्रेनेज सफाई देखील पूर्ण केल्याचे सांगण्यात आले. परंतु शहरामध्ये झालेल्या थोड्याश्या पावसाने देखील अनेक प्रमुख रस्त्यांवरील पावसाळी गटारे व ड्रेनेज व्हॉअरफ्लो होऊन दुगंर्धीयुक्त पाणी रस्त्यांवर येत होते. सोमवारी महापालिकेच्या मुख्य चौक, कात्रज रस्त्यावर दुध डेअरी येथे, स्वारगेट, नळस्टॉप चौक अनेक ठिकाणी ड्रेनेज व्हॉअरफ्लो होऊन दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यांवर येत असल्याचे प्रकार घटले. यामुळे या घाण पाण्यातून पुणेकरांना आपला मार्ग काढावा लागत होता.
-------------------
अर्ध्या तासाच्या प्रवसासाठी दोन तास...
शहरामध्ये मध्यवस्ती, उपनगर, मुख्य रस्त्यांवर झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीमुळे पुणेकरांना अर्ध्या तासाच्या प्रवासासाठी तब्बल दोन तास लागले. नळस्टॉप चौकातून फर्ग्युसन रस्त्यावरील ऑफिसला जाण्यास पाच ते सात मिनिट लागत असताना तब्बल अर्धा तास लागला, सिंहगड रस्त्यावरून धायरी ते लॉ कॉलेज रोडला येण्यास २० ते २५ मिनिट लागत असताना सोमवारी तब्बल एक तास लागला. हडपसर हून लक्ष्मी रस्त्यांवर येण्यासाठी नेहमी अर्धा ते पाऊन तास लागणाऱ्यांना सोमावरी दोन तास वाहतूक कोंडीमध्ये अडकून राहावे लागले.