मुसळधार पावसामुळे पुणे - मुंबई रेल्वे मार्गावरील वाहतुक विस्कळीत
By नितीश गोवंडे | Published: July 19, 2023 04:15 PM2023-07-19T16:15:46+5:302023-07-19T16:16:05+5:30
रेल्वे रुळ पाण्याखाली गेले असल्याने रेल्वे प्रशासनातर्फे हा निर्णय घेण्यात आला आहे
पुणे: मुंबईत सतत पडत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबई-पुणे-मुंबई रेल्वे मार्गावरील रेल्वे सेवा पुर्णपणे ठप्प पडली आहे. कर्जत-कल्याण रेल्वे मार्ग अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे बुधवारी (१९ जुलै) पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या आणि मुंबईहून पुण्याला येणाऱ्या सर्व रेल्वे रद्द करण्यात आल्या. रेल्वे रुळ पाण्याखाली गेले असल्याने रेल्वे प्रशासनातर्फे हा निर्णय घेण्यात आला आहे.
तसेच गुरूवारी (२० जुलै) देखील या मार्गावरील रेल्वे सेवा बंद राहणार असल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे. गुरूवारी सकाळी पुण्याहून मुंबईला जाण्यासाठी निघालेले प्रवासी रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचले, मात्र ४-५ तास रेल्वेत बसल्यानंतर, त्यांना रेल्वे प्रशासनाने रेल्वे रद्द केल्याचे सांगितले. यामुळे पुणे-मुंबई-पुणे मार्गावरील डेक्कन क्वीन, सिंहगड, डेक्कन, इंटरसिटी या रेल्वे उद्या देखील रद्द राहणार आहे. पुण्यामार्गे जाणाऱ्या तसेच मुंबईतून येणाऱ्या सर्व रेल्वे आज आणि उद्या रद्द राहणार आहेत.