पुणे-नगर मार्गावरील वाहतूक दाेन दिवस बंद; पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 01:27 PM2022-12-28T13:27:58+5:302022-12-28T13:32:13+5:30
विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यानिमित्त निर्णय...
पुणे : कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी रोजी हाेणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक दाेन दिवस बंद करण्यात येणार आहे. वाहतूककोंडी टाळण्याच्या दृष्टीने शनिवारी (दि. ३१) सायंकाळी ५ ते १ जानेवारी रात्री १२ पर्यंत येथील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.
हा सोहळा यशस्वी हाेण्यासाठी सर्व यंत्रणांनी मिळून प्रयत्न करावे. कार्यक्रमासाठीची पूर्वतयारी वेळेत पूर्ण करावी, असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. त्यामुळे अभिवादन सोहळ्यावेळी नागरिकांनी या पर्यायी मार्गाचा वापर करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन देशमुख यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त पोलिस आयुक्त रंजन कुमार शर्मा, पोलिस अधीक्षक अंकित गोयल, प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी हिंमत खराडे उपस्थित होते.
यंत्रणा सज्ज
अभिवादन सोहळ्यासाठी १ हजार ५०० शौचालयांची व्यवस्था केली असून, १५० अतिरिक्त कर्मचारी स्वच्छतेसाठी नियुक्त केले आहेत. रस्त्यावर ठिकठिकाणी कचराकुंड्या ठेवण्यात येणार आहेत. २१ आरोग्य पथकांत २४० कर्मचारी, ४१ रुग्णवाहिका, बाइक ॲम्ब्युलन्स, ३८ घंटागाड्या, १० अग्निशमन वाहने, १७५ कचारकुंड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
असा असेल बदल
१) शिक्रापूर ते चाकण अशी दोन्ही बाजूंनी येणारी सर्व वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. नगरकडून पुणे, मुंबईकडे येणारी जड वाहने शिरूर, न्हावरा फाटा, न्हावरा, पारगाव, चौफुला, यवत हडपसर अशी सोलापूर रस्तामार्गे पुण्याकडे येतील.
२) पुण्याहून नगरकडे जाणारी जड वाहने ही पुणे-सोलापूर महामार्गाने चौफुला, केडगाव मार्गे, न्हावरा, शिरूर, नगर रस्ता अशी जातील.
३) मुंबईकडून नगरकडे जाणारी जड वाहने, माल वाहतूक (ट्रक/टेम्पो) ही वडगाव मावळ, चाकण, खेड, मंचर, नारायणगाव, आळेफाटा मार्गे नगरकडे जातील. तसेच हलकी वाहने कार, जीप आदी वडगाव मावळ, चाकण, खेड, पाबळ, शिरूरमार्गे नगरकडे जातील.
कार्यक्रमादरम्यान स्वच्छता राहावी, यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ नियुक्त करावे. आरोग्य विभागाने मास्क वाटप करावे. शौचालयांची नियमित स्वच्छता होईल आणि पिण्याच्या पाण्याची उपलब्धता राहील, याकडे विशेष लक्ष द्यावे.
-डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी