औंध येथे साकारला जातोय ‘ट्रॅफिक पार्क’
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2020 01:09 PM2020-03-07T13:09:13+5:302020-03-07T13:09:37+5:30
पुणे शहरातील वाहतूक समस्या ही सर्वांसाठीच डोकेदुखी
पुणे : शहरातील वाहतूक समस्या वाढ ही नित्याची बाब झाली आहे. तसेच वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्यांची संख्यादेखील मोठी आहे. या पार्श्वभूमीवर भविष्यातील नागरिक वाहतूक साक्षर असावे, यासाठी औंध येथील ब्रेमेन चौक येथे लहान मुलांसाठी ट्रॅफिक प्लाझा साकारला जात आहे. या ट्रॅफिक प्लाझाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे.
पुणे शहरातील वाहतूक समस्या ही सर्वांसाठीच डोकेदुखी झाली आहे. वाढत्या शहरीकरणाबरोबर वाहनांची संख्यादेखील वाढत आहे. यामुळे ट्रॅफिक नियमांचे मोठ्या प्रमाणावर उल्लंघन शहरात होऊन मोठ्या प्रमाणात अपघात होतात. अनेकदा वाहतूक नियम न पाळल्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात.
त्यातच बेशिस्त वाहनचालकांमुळे या समस्येत अजूनच भर पडत आहे. लहान मुलांना आपल्या लहान वयातच एखादी गोष्ट शिकविली तर मुले त्या सवयीचा आयुष्यभर उपयोग करतात. या हेतूने मुलांना लहान वयातच वाहतुकीचे नियम कळावेत तसेच लहान वयापासूनच त्यांना वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याची सवय लागावी या हेतूने औंध येथील राजभवन रस्त्यावरील ब्रेमन चौक येथे अडीच एकर जागेमध्ये महानगरपालिकेच्या विभागामार्फत लहान मुलांसाठी ट्रॅफिक प्लाझा विकसित करण्याचे काम चालू आहे.
महानगरपालिकेच्या अधिकाºयांनी रस्ता सुरक्षा आणि रहदारीशी संबंधित मुद्द्यांचा अभ्यास करण्यासाठी युरोपीय देशांचा दौरा केला. त्यावेळेस डेन्मार्कची राजधानी कोपेनहेगन येथील ट्रॅफिक पार्क ज्या वेळेस अधिकाऱ्यांनी पाहिले त्यावेळेस पुण्यातदेखील एखाद्या ट्रॅफिक पार्क असावे, असा त्यांचा मानस होता. त्यानंतर औंध येथील ब्रेमन चौक येथे ट्रॅफिक पार्क साकारण्याचा निर्णय पुणे महानगरपालिकेतर्फे घेण्यात आला.
ट्रॅफिक पार्कमध्ये लहान लहान रस्ते असतील. त्या रस्त्यांमध्ये रहदारीची संकेत आणि चिन्हे बनविली जातील. मिनी सिग्नल, चिन्हांकित रस्ता, झेब्रा क्रॉसिंग, पदपथ, दुचाकी पार्किंग, गॅस स्टेशन, बसथांबे, रहदारी दिवे, लहान मुलांच्या सादरीकरणासाठी मिनी अँम्फीथिएटर, सँडपिट आणि लहान मुलांसाठी व्यायामाची उपकरणे तसेच मुलांबरोबर येणाºया पालक व शिक्षकांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्थेची देखील या ठिकाणी सोय करण्यात येणार आहे.
काही दिवसांपूर्वी या प्रकल्पांमध्ये अनेक अडचणी निर्माण झाल्या जागा ताब्यात घेता वेळेस स्थानिकांच्या विरोधाचा सामना अधिकाºयांना करावा लागला व हा प्रकल्प बंद होण्याची शक्यता निर्माण झाली.
.......
प्रकल्प सुरू करताना स्थानिक नागरिकांनी जागा देण्यास विरोध केला. परंतु त्यांना विश्वासात घेऊन व त्यांच्या अडचणी सोडवून नंतरच जागेचे हस्तांतरण करण्यात आले. लहान मुलांना लहान वयामध्ये वाहतुकीचे नियमांचे पालन करण्याची शिस्त लागावी या हेतूने हा प्रकल्प साकारण्यात येत असून या प्रकल्पासाठी अंदाजे दीड कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या ठिकाणी लहान मुलांसाठी छोट्या सायकलींचीदेखीलसोय करण्यात येणार आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल. लहान मुलांना आकर्षित करतील, असे ट्रॅफिक सिग्नल, झेब्रा क्रॉसिंग, पादचारी मार्ग या ठिकाणी तयार करण्यात येणार आहेत.अर्चना मधुकर मुसळे, स्थानिक नगरसेविका.
..........
ट्रॅफिक पोलिस अधिकाºयांनी देखील या संकल्पनेचे कौतुक केले असून ही संकल्पना मोठ्या प्रमाणावर राबविण्यासाठी त्यांनी येरवडा परिसरातील दोन एकर जागेत देखील अशा प्रकारचे चिल्ड्रन्स ट्रॅफिक पार्क बनवावे, अशी आॅफर दिली आहे, असे पथ विभागाचे अधिकारी दिनकर गोजरे यांनी सांगितले.