रेल्वेत प्रवाशांच्या बॅग चोरणारा अटकेत; पुणे आरपीएफची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 01:55 PM2017-10-25T13:55:28+5:302017-10-25T14:01:13+5:30
रेल्वे प्रवाशांच्या बॅग चोरणार्यास पुणे आरपीएफच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून रेल्वे प्रवाशांचे चोरी केलेले सोन्याचे दागिने व अन्य सामान असा एकूण ४ लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पुणे : खबर्यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार रेल्वे प्रवाशांच्या बॅग चोरणार्यास पुणे आरपीएफच्या पथकाने अटक केली आहे.
आरपीएफ पुणे चे विभागीय सुरक्षा आयुक्त श्री विकास ढाकने यांच्या मार्गदर्शन खाली रेल्वे प्रवाशांच्या सामानाची चोरी करणार्या आरोपींच्या धरपकड करण्याकरीता निरीक्षण अपराध शाखा पुणे सुनील चाटे व निरीक्षक आरपीएफ पुणे संदीप खिरटकर यांच्या मार्गदर्शनाखाली उप निरीक्षक चंद्रशेखर रोकडे, संतोष बडे, हवलादार विजयकुमार चौधरी, कॉन्स्टेबल शकील तडवी, अप्पासाहेब काशीद यांची नेमणूक केली होती. आरपीएफ टीम ला खबर्यामार्फत मिळालेल्या माहिती नुसार या टीमने एक व्यक्ती गणेश उर्फ विशाल पिताम्बर साळवे (वय २७, रा. हद्दीवाली चाळी, भुसावळ) यास पुणे स्टेशन येथे मंगळवारी (दि. २४) पकडले. त्याच्याकडून रेल्वे प्रवाशांचे चोरी केलेले सोन्याचे दागिने व अन्य सामान असा एकूण ४ लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या आरोपीला त्याकडून मिळून आलेल्या मुद्देमालासहित लोहमार्ग पोलीस पुणे रेल्वे स्थानक यांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास लोहमार्ग पोलीस करत आहेत.
या आरोपीस गुन्हा नंबर ६२६/२०१७ कलम ३७९ अन्वये अटक करण्यात आली असून पुढील तपास चालू आहे. या आरोपीकडून अजून काही गुन्ह्यांची उकल होऊ शकते. त्याच्यावर भुसावळ लोहमार्ग येथे चोरीचे गुन्हे दाखल आहेत.