वाहतुक पाेलीस आणि पीएमपीची अनिधिकृत प्रवासी वाहतुक करणाऱ्यांवर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2019 09:28 PM2019-06-02T21:28:51+5:302019-06-02T21:32:37+5:30
वाहतुक पोलिस व पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) वतीने संयुक्तपणे अनधिकृतपणे प्रवासी वाहतुक करणाऱ्या वाहनांवर रविवार (दि. २ मे) कारवाई सुरू करण्यात आली आहे.
पुणे : वाहतुक पोलिस व पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) वतीने संयुक्तपणे अनधिकृतपणे प्रवासी वाहतुक करणाऱ्या वाहनांवर रविवार (दि. २ मे) कारवाई सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी एक पोलिस उपनिरीक्षक व दोन कर्मचारी तसेच पीएमपीचे दोन चेकर यांची टीम तयार करण्यात आली असून सध्या स्वारगेट विभागात कारवाई केली जात आहे.
पुणे व पिंपरी चिंचवड शहरामध्ये ठिकठिकाणी खासगी वाहनांमधून अनधिकृतपणे प्रवासी वाहतुक केली जात आहे. त्याचा फटका पीएमपीला बसत आहे. खासगी कंपन्यांच्या बस, सहा आसनी रिक्षा चालकांकडून बसस्थानकांलगत थांबून ही वाहतुक केली जात आहे. त्यामुळे पीएमपी प्रवासी कमी होत आहेत. यापार्श्वभुमीवर पीएमपी प्रशासनाने वाहतुक पोलिसांचे सहकार्य घेतले आहे. काही दिवसांपासून पिंपरी चिंचवड मध्ये हा प्रयोग सुरू करण्यात आला आहे. पीएमपीच्या विनंतीनुसार तेथील वाहतुक विभागाने कारवाईसाठी पोलिस कर्मचारी दिले आहेत. त्यानुसार कारवाईही करण्यात येत आहे. याचधर्तीवर पुण्यातही अशी कारवाई सुरू करण्यात आली आहे.
यासंदर्भात शनिवारी वाहतुक पोलिस उपायुक्त पंकज देशमुख यांच्या कार्यालयात बैठक झाली. पीएमपीचे बीआरटी व्यवस्थापक अनंत वाघमारे यावेळी उपस्थित होते. बैठकीमध्ये झालेल्या चचेर्नंतर रविवारी स्वारगेट विभागात कारवाई सुरू केली आहे. एक पोलिस उपनिरीक्षक व दोन कर्मचारी पीएमपीला कारवाईसाठी देण्यात आले आहे. पीएमपीचे दोन चेकर त्यांच्यासोबत असतील. त्यांना स्वतंत्र वाहनही देण्यात आले आहे. रविवारी स्वारगेट व कात्रज परिसरात अनधिकृत वाहतूक करणाऱ्या सहा आसनी रिक्षांवर कारवाई करण्यात आली. दोन रिक्षाला जॅमर लाऊन काञज आगारात जमा करण्यात आल्या आहेत. स्वारगेट विभागात पुढील आठ दिवस ही कारवाई सुरू राहील. त्यानंतर शहरभर टप्प्याटप्याने कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती वाघमारे यांनी दिली.