हॉर्न नॉट ओके प्लीज : ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांवर भरणार खटले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2018 08:58 PM2018-09-01T20:58:30+5:302018-09-01T21:12:31+5:30
शांतता क्षेत्रासह अन्य ठिकाणी जोरजोरात हॉर्न वाजविणे, मोठ्या आवाजाचे हॉर्न बसविणे, आवाज करणारे सायलेंसर वापरणे तसेच वाहनांद्वारे विविधप्रकारे होणारे ध्वनीप्रदुषण आता चालकांना महागात पडणार आहे.
पुणे : शांतता क्षेत्रासह अन्य ठिकाणी जोरजोरात हॉर्न वाजविणे, मोठ्या आवाजाचे हॉर्न बसविणे, आवाज करणारे सायलेंसर वापरणे तसेच वाहनांद्वारे विविधप्रकारे होणारे ध्वनीप्रदुषण आता चालकांना महागात पडणार आहे. परिवहन विभाग तसेच वाहतुक पोलिसांकडून असे ध्वनीप्रदुषण करणाऱ्या वाहनचालकांवर थेट न्यायालयात खटले दाखल केले जाणार आहेत.त्यामुळे वाहनचालकांनी नागरीकांना त्रास होईल अशा पध्दतीने विनाकारण मोठ्या आवाजात हॉर्न वाजवू नये, असे आवाहन दोन्ही विभागांकडून करण्यात आले आहे.
रस्ते अपघातासोबतच वाहनांद्वारे होणारे ध्वनीप्रदुषण ही एक सामाजिक समस्या बनली आहे. यापार्श्वभुमीवर परिवहन विभाग व वाहतुक पोलिसांकडून पुणे जिल्ह्यात दि. १२ सप्टेंबर रोजी ‘नो हॉर्न डे’ घोषित करण्यात आला आहे. यादिवशी वाहनचालकांनी रस्त्यावर आल्यानंतर एकदाही हॉर्न न वाजवता हा दिवस साजरा करावा, अशी या दिवसाची संकल्पना आहे.वाहतुक पोलिस उपायुक्त तेजस्वी सातपुते, प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. या उपक्रमामध्ये सर्व शासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, एसटी महामंडळ, पीएमपी, वाहतुकदार संघटना यांसह सामाजिक संस्थांनाही सहभागी करून घेतले जाणार आहे. याअंतर्गत हॉर्न वाजवविण्याचे दुष्परिणाम व हॉर्न न वाजवता वाहन चालविण्याचे महत्व याबाबत प्रबोधन केले जाणार आहे.
विनाकारण हॉन वाजविण्याचे प्रमाण सुमारे ८० टक्के असल्याचे सांगत आजरी म्हणाले, पुण्यामध्ये पहिल्यांदाच ‘नो हॉर्न डे’ ही संकल्पना राबविली जाणार जात आहे. वाहनचालकांनी स्वत:हून या मोहिमेत सहभागी व्हायला हवे. दंडात्मक करावाई तर यापुढेही सुरूच राहणार आहे. याबाबत हॉर्न विक्रेत्यांची बैठक घेऊ़न त्यांना मोठ्या आवाजातील, बेकायदेशीर हॉर्न विक्री न करण्याची ताकीद देण्यात आली आहे. त्यांचे परवानेही रद्द होऊ शकतात.
सातपुते म्हणाल्या, काही वाहनचालक विनाकारण हॉर्न वाजवितात. पेठांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना या मोठ्या प्रमाणावर त्रास होतो. याबाबत तक्रारीही आल्या आहेत. वाहतुक पोलिसांकडून अशा वाहनचालकांवर सातत्याने कारवाई केली जात आहे. केवळ दंड न आकारता वाहनाचा हॉर्न काढून घेतला जातो. हा हॉर्न ज्या दुकानदाराकडून घेतला त्यांनाही नोटीस पाठवून कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. यापुढील काळात कारवाईचे प्रमाण वाढविले जाईल. त्यासोबत आता जनजागृतीही केली जाणार आहे. नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने या मोहिमेत सहभागी व्हावे.
दिवसभरात एक कोटीवेळा वाजतो हॉर्न
पुणे प्रादेशिक परिवहन विभागाकडे दि. ३१ जुलैपर्यंत ३७ लाख १६ हजार ६९९, पिंपरी चिंचवड कार्यालयाकडे १७ लाख ७० हजार ७८४ तर बारामती कार्यालयाकडे ३ लाख ८५ हजार ४०८ वाहनांची नोंद आहे. पुणे जिल्ह्याची एकुण वाहनसंख्या ५८ लाख ७२ हजार ८९१ एवढी आहे. या वाहनांपैकी किमान २५ टक्के वाहनांचा दैनंदिन वापर होतो. प्रत्येक वाहनचालक किमान ५ ते १० वेळा हॉर्नचा वापर करतो. केवळ पुणे शहराचा विचार केल्यास दिवसभरात किमान एक कोटीवेळा हॉर्न वाजिवला जातो, अशी माहिती आजरी यांनी दिली.