वाहतूक पोलीस ‘घोळ’क्यातच
By admin | Published: April 30, 2015 12:33 AM2015-04-30T00:33:39+5:302015-04-30T00:33:39+5:30
घोळ’क्याने उभे न राहता वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियमनावर अधिक भर द्यावा, असे स्पष्ट आदेश पोलीस आयुक्त के. के. पाठक यांनी देऊनही वाहतूक पोलिसांची घोळका संस्कृती अद्यापही सुरूच आहे.
पुणे : ‘घोळ’क्याने उभे न राहता वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियमनावर अधिक भर द्यावा, असे स्पष्ट आदेश पोलीस आयुक्त के. के. पाठक यांनी देऊनही वाहतूक पोलिसांची घोळका संस्कृती अद्यापही सुरूच आहे. चालकांवर झडप घालून गर्दीच्या वेळीही दंडवसुली करण्यात येत असल्यामुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत.
वाहतूक पोलिसांनी सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी वाहनचालकांच्या दंडाच्या पावत्या फाडण्यापेक्षा वाहतूक नियमनावर भर द्यावा, असे आदेश पोलीस आयुक्तांनी गेल्याच आठवड्यात दिले आहेत. यासोबतच वाहतूक नियमन आणि दंडवसुलीकरिता स्वतंत्र कर्मचारी नेमण्याच्या सूचनाही त्यांनी केलेल्या आहेत. परंतु, शहरातील मुख्य चौकांसोबतच गर्दीच्या ठिकाणी वाहतूक पोलिसांकडून अद्यापही नियमनापेक्षा दंडवसुलीलाच अधिक महत्त्व देण्यात येत असल्याचे दिसते.
सध्या शहरात सगळीकडे रस्त्यांची खोदाई सुरू आहे. त्यामुळे अरुंद असलेले रस्ते अधिकच छोटे झाले आहेत. त्यामुळे वाहतूककोंडीमध्ये भर पडत चालली आहे. रस्ते व पार्किंगच्या जागा खोदून ठेवल्यामुळे वाहने लावण्याचाही प्रश्न उद्भवला आहे. या सर्वांचा भुर्दंड वाहनचालकांनाच सोसावा लागत आहे. (प्रतिनिधी)
४वाहतूक पोलीस दंडवसुलीमध्ये मग्न झाल्यामुळे चौकांमध्ये काही वेळातच वाहतूककोंडी व्हायला सुरुवात होते.
४वाहनांच्या रांगा लागायला लागतात. बुधवारी दिवसभरात शहराच्या मध्यवस्तीतील अभिनव महाविद्यालय चौक, बाबा भिडे पूल आणि जयंतराव टिळक पुलावर वाहतूक पोलीस घोळक्याने उभे असलेले आणि दंडाच्या पावत्या फाडत असल्याचे दिसून आले.