वाहतूक पोलिसांनी ६५९ निराधारांना केले निवारा केंद्रात दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 10:12 PM2020-03-29T22:12:52+5:302020-03-29T22:12:57+5:30
वाहतूक पोलिसांनी ८ तास ड्युटी
पुणे : काम नसल्याने तसेच घर नसलेल्या रस्त्यावर राहणार्या ६५९ निराधारांना वाहतूक पोलिसांनी रविवारी शहरातील विविध निवारा केंद्रात दाखल केले. तेथे त्यांची जेवणाची सोय केली. याचबरोबर शहरातील वाहतूक पोलिसांवरील ताण कमी करण्यासाठी त्यांना आठ तासांची ड्युटी लागू केली असल्याची माहिती अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी दिली.
याबाबत डॉ. शिंदे यांनी सांगितले की, सकाळी ७ ते दुपारी ३, दुपारी ३ ते रात्री ११ आणि रात्री ११ ते सकाळी ७ अशा तीन शिफ्टमध्ये ड्युट्यांचे नियोजन करण्यात आले आहे. वाहतूक पोलिसांनी ८ तास काम केल्यावर त्यांना १५ तास विश्रांती मिळेल, याकडे ड्युटी लावताना पाहण्यास सांगण्यात आले आहे.
एखाद्या कर्मचार्याने आज नाकाबंदी केली तर त्याला दुसर्या दिवशी दुसरे इतर काम देण्याचे नियोजन केले जात आहे. त्याचवेळी अधिकारी कमी असल्याने सध्या त्यांच्यावर जास्त भार पडत आहे. त्यांनाही सातत्याने तेच काम न देता़ त्यांच्या कामात बदल कसा करता येईल, याकडे लक्ष दिले जात आहे.