वाहतूक पोलीस पुणेकरांची घेणार स्वयंशिस्तीची परीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2019 12:30 PM2019-05-22T12:30:14+5:302019-05-22T12:44:54+5:30
शहरातील अनेक चौकात वाहतूक पोलीस नसले की नियम मोडण्यासाठी वाहनचालकांची जणू स्पर्धा सुरु असल्याचे चित्र दिसते़..
विवेक भुसे
पुणे : चौकात किंवा आजू बाजूला झाडाखाली थांबलेले वाहतूक पोलीस दिसत नसल्याचे पाहून सिग्नल नसतानाही पटकन चौक ओलांडण्यात पुणेकरांचे कसब वाखाणण्याजोगे आहे़. आता शहरातील महत्वाच्या ५० ठिकाणी वाहतूक पोलीस राहणार नाहीत़. पण, त्यामुळे नियमभंग करण्याची संधी असे समजू नका़. कारण वाहतूक पोलीस नसले तरी अत्याधुनिक एएनपीआर कॅमेऱ्यांद्वारे वाहतूकीवर निगराणी ठेवण्यात येणार आहे़. त्याद्वारे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यां वाहनांवर कारवाई करण्यात येणार आहे़. त्यामुळे आता अशा पुणेकरांना आपल्या या कसबाला आवर घालावा लागणार आहे़. चौकात वाहतूक पोलीस असो अथवा नसो वाहतूक नियमांचे पालन करुन स्वयंशिस्तीचा धडा द्यावा लागणार आहे़.
शहरातील अनेक चौकात वाहतूक पोलीस नसले की नियम मोडण्यासाठी वाहनचालकांची जणू स्पर्धा सुरु असल्याचे चित्र दिसते़. त्यात दुचाकीस्वारापासून अगदी पीएमपी चालकही अपवाद नाही़. सध्या चौकात बसविलेले कॅमेरे हे वाहन थांबले असेल व तो झेब्रा कॉसिंगवर उभा आहे़, त्याने हॅल्मेट घातलेले नाही. तरच त्या वाहनचालकाचा फोटो काढून त्यावरुन कारवाई केली जाते़ अशा वाहनचालकांना दंडाची माहिती त्यांच्या मोबाईलवर देण्यात येते़. काही दुचाकीस्वारांकडून वाहतूक पोलिसांनी १२ हजार रुपयांपर्यंत दंड वसुल केला आहे़.
परदेशात कोणत्याही सिग्नलवर वाहतूक पोलीस दिसत नाही़. तेथे नागरिक सिग्नल स्वयंशिस्तीने पाळताना दिसतात़ कोणी नियमभंग केला तर त्याच्यावर इलेक्ट्रॉनिक साधनांद्वारे नजर ठेवली जाते़ . तशीच सवय आपल्याकडील वाहनचालकांना याद्वारे लावण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे़. वाहतूक शाखेच्या वतीने शहरातील महत्वाच्या ५० चौकात एएनपीआर (अॅटोमॅटिक नंबरप्लेट रेकग्निशन) कॅमेरे बसविण्यात येणार आहे़. हे कॅमेरे चालत्या गाडीचे नंबरप्लेटही शोधून त्या फोटो काढते़. हे सर्व स्वयंचलित पद्धतीने होणार असल्याने त्यात मानवी हस्तक्षेप राहणार नाही़. त्यामुळे चौकात सिग्नल तोडून जाणारे वाहनही पोलिसांच्या या कॅमेऱ्यापासून लपून राहणार नाही़. त्यातून नागरिकांमध्ये स्वयंशिस्त वाढीस लागावा यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे वाहतूक शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले़.
़़़़़़़़़़
* चौकात वाहतूक पोलीस राहणार नाही
* अत्याधुनिक एएनपीएआर कॅमेऱ्याद्वारे निगराणी
* सिग्नल तोडणारे वाहन व इतर वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहनांच्या नंबरप्लेटचा फोटो हा कॅमेरा अॅटोमॅटिक पद्धतीने काढणार
* नागरिकांमध्ये वाहतूक नियमांबाबत स्वयंशिस्त वाढीस लावण्याचा प्रयत्न