पुण्यातील पेठांमधील वाहतूककोंडीवर प्रशासनही हतबल; अरुंद रस्ते अन् वाहनतळांची कमतरता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 12:30 PM2017-12-02T12:30:50+5:302017-12-02T12:39:19+5:30
पेठांमधील अरूंद रस्ते, वाहनतळ हाकेच्या अंतरावर असूनही रस्त्यांच्या दुतर्फा बाजूस पार्क केली जाणारी वाहने, रस्त्यांना वाहनांचा पडत असलेला विळखा, पदपथांवर केले जाणारे अतिक्रमण हे चित्र अद्यापही बदललेले नाही.
नम्रता फडणीस
पुणे : एकीकडे महापालिकेकडून सायकल धोरण राबविले जात आहे, सायकलींचे ट्रॅक करण्याच्या चर्चा झडत आहेत, पण मूळ प्रश्नालाच बगल देण्याचा प्रयत्न होतो आहे. शहराच्या मध्यवर्ती पेठांमधील अरूंद रस्ते, वाहनतळ हाकेच्या अंतरावर असूनही रस्त्यांच्या दुतर्फा बाजूस पार्क केली जाणारी वाहने, यामुळे रस्त्यांना वाहनांचा पडत असलेला विळखा, पदपथांवर केले जाणारे अतिक्रमण हे चित्र अद्यापही बदललेले नाही. या गोष्टींमुळे पेठांमधील बहुतांश रस्त्यांवर वाहतूककोंडीचा सामना पुणेकरांना करावा लागत आहे. महापालिकेकडून केवळ प्रमुख रस्त्यांचा विचार केला जातोय, मात्र पेठांचा श्वास असलेल्या अरूंद गल्ल्या आणि बोळांमध्ये वाहतूककोंडीच्या उद्भवणाऱ्या समस्यांचे काय? हा प्रश्न मात्र अनुत्तरितच राहिला आहे. या रस्त्यांवर मुलभूत सोयीसुविधांचा असलेला अभाव आणि वाहनतळामध्ये वाहनांच्या पार्किंगसाठी असलेली अपुरी जागा या बाबींमुळे वाहतूककोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी वाहतूक शाखाही ‘हतबल’ झाली आहे.
पादचाऱ्यांना पदपथांचा विनाअडथळा वापर करता यावा यासाठी लक्ष्मी रस्ता परिसरातील लिंबराज महाराज चौक (नगरकर तालीम चौक) ते उंबऱ्या गणपती चौक (शगुन चौक) या चारशे मीटर अंतरात तीन महिन्यांपूर्वी महापालिका प्रशासनाने प्रायोगिक तत्वावर ‘वॉकिंग प्लाझा’ राबविण्याच्या दृष्टीने पुन्हा एकदा पावले उचलली आहेत. त्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करून हा वॉकिंग प्लाझाचा प्रस्ताव शहर वाहतूक पोलिसांकडे लवकरच पाठविला जाणार आहे. मात्र अद्याप त्याबाबत कोणत्याच हालचाली सुरू झालेल्या नाहीत.
एकीकडे महापालिका प्रशासनाकडून शहरातील प्रमुख रस्त्यांचा विचार केला जातोय, मात्र पेठांचा श्वास असलेल्या गल्ली, बोळांमध्ये होणारी वाहतूककोंडी सोडविण्यासाठी अद्यापही तोडगा निघालेला नाही. सदाशिव पेठ, नारायण पेठ, नाना पेठ सारख्या भागांमध्ये ‘लोकमत’ प्रतिनिधीने प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असता अरूंद रस्त्यांवर एका बाजूला पार्क केलेल्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा विळखा रस्त्यांना पडलेला दिसला. गणेश पेठेतील संपूर्ण रस्ता वाहनांनी ब्लॉक झाल्याने पादचाऱ्यांना रस्त्यांवरून मार्ग काढणे देखील मुश्किल झाले होते. नारायण पेठेमध्ये मोदी गणपतीच्या बाजूस तसेच पुणे मराठी ग्रंथालयाच्या मागील बाजूस महापालिकेचा वाहनतळ आहे. मात्र त्याच्या बाहेरच्या बाजूसच दुचाकी वाहने मोठ्या प्रमाणावर पार्क केल्याचे दिसून आले.
काही रस्त्यावरील पदपथांवरच दुकानचालकांनी सामान ठेवल्याने लोकांना रस्त्याचा वापर करणे भाग पडत होते. रविवार पेठेतील पदपथांवर पुन्हा एकदा विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्याने पदपथ नक्की कुणासाठी आहेत, हाच प्रश्न उपस्थित झाला आहे. लक्ष्मी रस्ता हा शहरातील महत्त्वाचा रस्ता आहे. व्यावसायिक दृष्टीकोनातून या रस्त्याला विशेष महत्त्व आहे. रस्त्याच्या दुतर्फा उभ्या करण्यात येणाऱ्या दुचाकी, तसेच वाहनांची वर्दळ, पदपथांवर झालेले अतिक्रमण यामुळे पादचाऱ्यांना विनाअडथळा प्रवास करणे अशक्य झाले आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली ही समस्या कधी संपुष्टात येणार? याची प्रतिक्षा पुणेकर करीत आहेत.
लक्ष्मी रस्त्यावरच्या चारशे मीटर अंतरात ‘वॉकिंग प्लाझा’ सुरू करण्यासाठीच्या संदर्भात महापालिका प्रशासनाने वाहतूक शाखेला एक पत्र दिले आहे. यासंबंधीचा प्रस्ताव तयार करण्यासाठी एका सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली आहे. पार्किंग कुठे असेल, वन वे कुठे करायचा, वाहतुकीचे नियोजन कसे केले जाईल, याचा अभ्यास सुरू आहे. ते झाल्यानंतर वाहतूक शाखेला प्रस्ताव सादर केला जाणार आहे.
- राजेंद्र राऊत, पथविभाग प्रमुख
पेठांमधील रस्त्यांवर मुलभूत सोयीसुविधांचाच मोठा अभाव आहे. वाहनतळांमधली जागा अपुरी असल्याने रस्त्यावर पार्किंग करण्याशिवाय पर्याय नाही. तरीही आम्ही वाहतुकीचे नियंत्रण करण्याचा प्रयत्न करीत आहोत. यापुढील काळात वाहतूककोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी अधिक मनुष्यबळाचा वापर केला जाईल. महापालिका पार्किंग धोरण आणण्याचा विचार करीत आहे, त्याने परिस्थितीत बदल होईल.
- अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा