काही सेकंदाची घाई कशासाठी भावा? वेळ नव्हे, जीव महत्त्वाचा!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2022 03:24 PM2022-08-13T15:24:06+5:302022-08-13T15:25:02+5:30
सहा महिन्यांत ३७ हजार वाहनांनी तोडले सिग्नल....
पुणे : वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्यांची संख्या पुण्यात दिवसेंदिवस वाढत आहे. पोलीस अशा लोकांवर दंडात्मक कारवाई करतात; पण शेवटी काही सेकंदांच्या घाईमुळे आपला जीव जाऊ शकतो हे भान वाहनधारकांना राहत नाही. यामुळे किरकोळ अपघातांसह गंभीर अपघात देखील होण्याचा धोका अधिक असतो. तसेच सिग्नल यंत्रणा ही वाहतुकीचे नियोजन चांगल्या पद्धतीने व्हावे यासाठी उभारलेली असते. मात्र पुणेकर मात्र सिग्नलही जुमानत नसल्याचे पोलिसांनी कारवाई केलेल्या वाहनांच्या आकडेवारीवरून सिद्ध होते. त्यामुळे वाहन चालवताना वाहतूक नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे.
सहा महिन्यांत ३७ हजार वाहनांनी तोडले सिग्नल
पुणे शहर वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १ जानेवारी ते ११ ऑगस्ट या कालावधीत ३७ हजार ७ वाहनधारकांनी सिग्नल तोडला आहे. यात काहींनी तर एकापेक्षा अधिक वेळा सिग्नल तोडला असल्याचे त्यांच्यावर केलेल्या दंडात्मक कारवाईवरून सिद्ध होत आहे.
दंड किती ?
पहिल्यांदा सिग्नल तोडल्यावर वाहतूक पोलिसांकडून ५०० रुपये दंड आकारण्यात येतो. यानंतर मात्र पुुन्हा जेवढ्या वेळी वाहन चालक सिग्नल तोडणार त्याला प्रत्येकवेळी १५०० रुपये दंड ठोठावण्यात येतो.
सात महिन्यात भरला १ कोटी ९४ लाख रुपयांचा दंड
सिग्नल तोडलेल्या ३७ हजार ७ वाहनधारकांनी ११ ऑगस्टपर्यंत १ कोटी ९२ लाख ५१ हजार ५०० रुपयांचा दंड भरला आहे. सिग्नल तोडणाऱ्यांपैकी ६३२ जणांनी १५०० रुपयांप्रमाणे दंड भरला असल्याचे देखील यावरून सिद्ध होते.
अपघाताची शक्यता वाढते
पुणेकरांमध्ये सिग्नल तोडण्याची जणू स्पर्धाच लागली असल्याचे दिसून येते. काही मिनिटे सिग्नलवर थांबण्यास वाहनचालक तयार नसतात. पण यामुळे ज्या रोडवरील सिग्नल सुटला आहे ती वाहने भरधाव जात असताना आपण सिग्नल तोडला तर गंभीर अपघात होऊ शकतो. जीव जाऊ शकतो याचे भान वाहनचालकांना नसते. मुळात जर आपण नियमांचे पालन केले तर दंडही भरावा लागणार नाही आणि अपघातही होणार नाही.
नागरिकांनी वाहन चालवताना वाहतूक नियमांचे पालन करणे गरजेचे असते. आम्ही वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करतो; पण वाहनचालकांच्या घाईमुळे गंभीर अपघात झाला तर ते जीवावर बेतू शकते, यामुळे वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
- राहुल श्रीरामे, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा