Chandani Chowk Pune: चांदणी चौकात दररोज मध्यरात्री अर्धा तास वाहतूक बंद राहणार
By नितीश गोवंडे | Published: October 10, 2022 07:37 PM2022-10-10T19:37:53+5:302022-10-10T19:38:03+5:30
पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील चांदणी चौकातील रस्ता ब्लास्टिंगचे काम पूर्ण होईपर्यंत नियम लागू
पुणे : पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील चांदणी चौकातील रस्ता ब्लास्टिंगचे काम पूर्ण होईपर्यंत दररोज मध्यरात्री अर्ध्या तासासाठी संपूर्ण वाहतूक बंद असणार आहे. १० ऑक्टोबर मध्यरात्री साडेबारा ते एक दरम्यान हा नियम लागू करण्यात आला आहे.
चांदणी चौकातील पूल १ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री एक वाजता पाडल्यानंतर, सध्या साताऱ्याकडून मुंबईकडे जाण्यासाठी तीन लेन आणि मुंबईहून साताऱ्याकडे जाण्यासाठी साडेचार लेन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दरम्यान बाजूचा पाषाण फोडण्यासाठी हा अर्ध्यातासाचा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
पूल पाडल्यानंतर उर्वरीत कामासाठी रविवारी दुपारी दोनवेळा १० ते १५ मिनिटांचा ब्लॉक घेण्यात आला होता. त्यामुळे मुंबई-सातारा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. चांदणी चौक येथे खडक फोडण्यासाठी सुरुंग लावण्याबाबत कोणतीही पूर्वकल्पना न देता ‘एनएचएआय’ने पुन्हा ३ ऑक्टोबर सोमवार रोजी दुपारी दीडच्या सुमारास रस्ता २० मिनिटे वाहतुकीसाठी बंद केला होता. त्याचा फटका हजारो वाहनचालकांना बसला. त्यानंतर जवळपास संपूर्ण दिवसभर या रस्त्यावर वाहनांची कोंडी झाली होती. त्यात विद्यार्थ्यांच्या वाहतुकीची वाहने कोंडीत अडकल्याने पालक हवालदिल झाले होते.
या प्रकारानंतर आता एनएचएआय तर्फे पत्रक काढून काम होईपर्यंत दररोज मध्यरात्री अर्धातास रस्ता बंद केला जाणार असल्याचे सांगितले. तसेच यावेळी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.