वाहतूककोंडी होणार कमी
By Admin | Published: December 30, 2016 04:43 AM2016-12-30T04:43:48+5:302016-12-30T04:43:48+5:30
हिंजवडी ते शिवाजीनगर या नव्या मेट्रो मार्गामुळे हिंजवडीतील वाहतुकीवरील ताण कमी होण्यास मदत होईल. तसेच पिंपरी, चिंचवड, वाकड, ताथवडे आणि थेरगावमधील
पिंपरी : हिंजवडी ते शिवाजीनगर या नव्या मेट्रो मार्गामुळे हिंजवडीतील वाहतुकीवरील ताण कमी होण्यास मदत होईल. तसेच पिंपरी, चिंचवड, वाकड, ताथवडे आणि थेरगावमधील नागरिकांना हिंजवडीमार्गे शिवाजीनगरला जाण्यासाठी एक जलद सेवेचा मार्ग उपलब्ध होऊ शकेल. हिंजवडी आयटी क्षेत्रातील कामगारांबरोबर परिसरातील नागरिकांना उत्तम दर्जाची दळणवळण सुविधा उपलब्ध होणार असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट आणि रामवाडी ते वनाज या दोन मेट्रो मार्गानंतर हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाची नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली. हिंजवडी ते शिवाजीनगर या २३.५ किलोमीटर मेट्रो मार्गास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. हिंजवडीतील राजीव गांधी आयटी पार्कमधील विविध कंपन्यांमध्ये सुमारे दोन लाख कामगार काम करतात.
औद्योगिकीकरणास मिळेल आणखी चालना
पिंपरी-चिंचवड ते शिवाजीनगर आणि हिंजवडी ते शिवाजीनगर हे दोन मेट्रो मार्ग औद्योगिकीकरणास चालना देण्यास उपयुक्त ठरणार आहेत. रस्त्यांचे जाळे हे शहराच्या विकासाच्या रक्तवाहिन्या मानल्या जातात. ज्या ठिकाणची दळणवळण यंत्रणा सक्षम, त्या ठिकाणी विकासाला अधिक चालना मिळत असते. पिंपरी-चिंचवड सध्या पुण्यापासून थोडे दूर वाटत असले, तरी मेट्रोसारख्या जलद वाहतूक प्रकल्पामुळे हे अंतर कमी होऊ शकेल. पुणे व पिंपरी-चिंचवडच्या एकत्रित विकासाचा सेतू म्हणून मेट्रो उपयुक्त ठरणार आहे.
या परिसरात सुमारे दीड ते दोन लाख वाहनांची वर्दळ असते. हिंजवडी ते वाकड पूल या मार्गावर नेहमीच आयटी कंपन्या सुटतेवेळी वाहतूककोंडी होऊ लागली आहे. आयटी कंपन्यांची अभियंत्यांना ने- आण करण्याची व्यवस्था सक्षम नाही. त्यामुळे आयटी कंपन्यांमध्ये काम करणारे बहुतांशी कर्मचारी स्वत:च्या वाहनाने ये-जा करतात. त्यामध्ये चारचाकी वाहने वापरणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नाही. त्यातच आयटी कंपन्यांची वाहन सुविधा अपुरी पडत असल्याने हिंजवडी आयटी पार्क परिसरात स्वत:ची वाहने घेऊन येणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. उत्तम दर्जाची वाहतूक सुविधा असल्यास स्वत:चे वाहन वापरण्याचे प्रमाण कमी होईल.
पिंपरी ते शिवाजीनगर हा मेट्रो मार्ग पुणे-मुंबई महामार्गाने जाणार आहे. हा मार्ग निगडीपर्यंत नेण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून होऊ लागली आहे. विनाअडथळा, जलद वाहतूक सेवा बीआरटीनंतर आणखी जलद वाहतूक सेवा देणारा मेट्रो मार्ग पिंपरी ते कृषी महाविद्यालय, शिवाजीनगरपर्यंत होणार आहे. रस्त्यापेक्षा किती तरी पट उंच पुलावरून मेट्रोचे ट्रॅक तयार केले जाणार आहेत. त्यामुळे बीआरटी आणि नेहमीच्या वाहतूक व्यवस्थेतील पुलांचा कसलाही अडथळा मेट्रोला येणार नाही. बीआरटी बसने अवघ्या २० मिनिटांत निगडी ते दापोडी अंतर कापणे शक्य होणार आहे.