रखडलेल्या कामांचा अडथळा, रावेत, विकासनगर, किवळे भागांत जाणारे वाहनचालक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 01:02 AM2018-03-14T01:02:52+5:302018-03-14T01:02:52+5:30

मुंबई -बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील देहूरोड ते कात्रज बाह्यवळण रस्त्यावरील देहूरोड ते किवळे-रावेत दरम्यानच्या सेवा रस्त्यांची रखडलेली कामे, झालेली दुरवस्था, विकासनगर, रावेत, किवळे -विकासनगर भागात खोदून ठेवलेल्या पावसाळी गटारी, तसेच ओढे व नाल्यांवरील पुलांची रखडलेली व अद्याप सुरू न झालेल्या कामांमुळे महामार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.

Trafficked work obstacles, Ravet, Vikasnagar, Kavale areas | रखडलेल्या कामांचा अडथळा, रावेत, विकासनगर, किवळे भागांत जाणारे वाहनचालक त्रस्त

रखडलेल्या कामांचा अडथळा, रावेत, विकासनगर, किवळे भागांत जाणारे वाहनचालक त्रस्त

Next

किवळे : मुंबई -बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील देहूरोड ते कात्रज बाह्यवळण रस्त्यावरील देहूरोड ते किवळे-रावेत दरम्यानच्या सेवा रस्त्यांची रखडलेली कामे, झालेली दुरवस्था, विकासनगर, रावेत, किवळे -विकासनगर भागात खोदून ठेवलेल्या पावसाळी गटारी, तसेच ओढे व नाल्यांवरील पुलांची रखडलेली व अद्याप सुरू न झालेल्या कामांमुळे महामार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. सेवा रस्त्यांवर काही व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्याचे चित्र दिसून येत असून, महामार्गावर मार्गदर्शक, स्थलदर्शक फलक व सुरक्षेबाबत माहिती देणारे फलक लावलेले नसल्याने अपघातांना निमंत्रण मिळत आहे. काही स्थलदर्शकफलक चुकीच्या ठिकाणी लावले असल्याने संभ्रम निर्माण होत आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारचे देहूरोड येथील पोलीस ठाण्याच्या नजीकचा चौक ते सातारा (किमी 725 ते किमी 865) दरम्यानचे एकूण १४० किलोमीटर रस्त्याचे सहा पदरीकरणाचे काम एक आॅक्टोबर २०१० रोजी सुरू झाले असून, सदर काम पूर्ण करण्यासाठी ३० मार्च २०१३ पर्यंतची मुदत दिली होती.
कामासाठी १७२४ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता. या कामात मुख्य सहा पदरी रस्त्याच्या कामांसह महामार्गाच्या दोन्ही बाजूंना सेवा रस्ता बांधण्याचे नियोजन करण्यात आलेले होते. संबंधित ठेकेदार वारंवार विविध कारणे दाखवून कामाची मुदत वाढवून घेत आहे. वाढविलेली मुदत संपण्यास एक महिन्याचा अवधी उरलेला असताना अद्यापही विविध कामे पूर्ण झालेली नसून, काही कामांना सुरुवातही झालेली नसल्याचे लोकमतने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. देहूरोड येथील पोलीस ठाण्यानजीकच्या सेन्ट्रल चौकापासून शितळानगर (मामुर्डी) येथील भुयारी मार्गावरील पुलापर्यंत देहूरोड कॅन्टोन्मेंटच्या हद्दीत महामार्गाच्या दुतर्फा सर्वत्र जागा उपलब्ध आहे. अद्यापही सेवा रस्त्याच्या कामास सुरुवात करण्यात आलेली नाही. मामुर्डी येथील भुयारी मार्गावरील पुलाचे काम अर्धवट स्थितीत आहे. शितळानगर येथील कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वाहन प्रवेशकर वसुली केंद्रापासून जवळच सेवा रस्ता बांधण्यासाठी सिमेंट पाइप टाकून मोरीचे बांधकाम केले. मात्र, गेल्या दोन वर्षांत पुढे काहीही काम केले नाही. काही भागात सेवा रस्त्याचे सुरू केलेले काम पुन्हा बंद करण्यात आल्याचे दिसत आहे.
>पथदिवे : उजेड कधी पडणार याबाबत संभ्रम
देहूरोड-कात्रज महामार्गावर पथदिवे बसविण्यात आले असून, संबंधित दिवे सुरू कधी होणार याबाबत नागरिक सवाल उपस्थित करीत असून, महापालिका हद्दीत किवळे जकात नाका ते रावेत पवना नदीपर्यंत चार किलोमीटर अंतरात तीन हायमास्ट दिव्यांसह फक्त पाच-सहा पथदिवे सुरू असल्याचे दिसून आले आहे. कॅन्टोन्मेंट हद्दीपासून विकासनगर पेट्रोल पंपापर्यंत सेवा रस्त्याचे काम पूर्ण होत आले असताना ओढ्यावरील पुलाचे काम अर्धवट सोडलेले असून, त्या ठिकाणी रात्रीच्या वेळी दुचाकी वाहने पडल्याच्या घटना घडल्या आहेत. विकासनगर येथील शिंदे पेट्रोल पंप ते इंद्रप्रभा सोसायटी चौकाजवळ सिमेंट पाइपसाठी खोदलेला रस्ता बनविण्यात आला नसल्याने वाहन घसरून अपघात होत आहेत. पेट्रोल पंप ते इंद्रप्रभा चौक दरम्यान मुख्य महामार्ग व सेवा रस्ता यात मोठे अंतर असल्याने सुरक्षा उपाययोजना करण्याची गरज आहे.

Web Title: Trafficked work obstacles, Ravet, Vikasnagar, Kavale areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.