मोराची चिंचोलीत तस्करी आणि शिकारही
By admin | Published: December 1, 2014 11:25 PM2014-12-01T23:25:00+5:302014-12-01T23:25:00+5:30
चिंचोशी (ता.खेड) परिसरात मोरांचे वास्तव्य वाढत आहे. मात्र रात्रीच्या वेळी अज्ञात लोकांकडून मोरांची शिकार होत असल्याचे येथील ग्रामस्थांकडून समजते
भानुदास प-हाड, शेलपिंपळगाव
चिंचोशी (ता.खेड) परिसरात मोरांचे वास्तव्य वाढत आहे. मात्र रात्रीच्या वेळी अज्ञात लोकांकडून मोरांची शिकार होत असल्याचे येथील ग्रामस्थांकडून समजते. त्यामुळे मोरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, यामुळे मोरांचे दुसऱ्या जागी स्थलांतर होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे वन विभागाने करडी नजर ठेवून वेळीच मोरांची तस्करी करणाऱ्यांच्या मुसक्या आवळविण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
खेड तालुक्याच्या पूर्व भागातील चिंचोशी हे गाव डोंगराच्या लगत वसलेले असून, चासकमान धरणातील पाणी डाव्या कालव्यामार्फत या गावातून पुढे जाते. अन्न, पाणी, निवारा व भटकंतीसाठी मोकळे रान यांचा संगम येथे होतो. त्यामुळे अल्पप्रमाणात मोर या ठिकाणी पाहायला मिळायचे. गेल्या काही महिन्यांपासून चिंचोशी गावात मोरांचे वास्तव्य वाढू लागले असून, अल्प संख्य असलेले मोर जादा स्वरूपात आढळून येऊ लागले आहेत.
गावातील ग्रामस्थ मोरांचे संगोपन करण्यासाठी पुढाकार घेत असल्याने मोरांच्या वास्तव्याचा प्रश्न सुटून मोर बिनधास्तपणे भटकंती करतात. परंतु, गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी डोंगराळ भागात मोरांच्या जोर-जोराने ओरडण्याचा आवाज कानी पडतो. त्यामुळे काही अज्ञात लोकांकडून मोरांची शिकार होत असल्याची शक्यता स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.
रात्रीच्या वेळी हे अज्ञात लोक डोंगराळ भागात जाळी लावून दडी मारून बसत असून, पहाटेच्या वेळी गाडीवरून पोबारा करत आहेत. त्यांच्याकडे शिकारीचे साहित्य असल्याने ते मोरांचीच शिकार करतात, ही शक्यता अजिबात नाकारता
येत नाही.