ओतूरला नदीच्या प्रवाहात वाहून जाऊन ८ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू; जुन्नरमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 02:13 PM2024-10-23T14:13:09+5:302024-10-23T14:14:08+5:30
मुलगा आईबरोबर नदीवर कपडे धुवायला गेल्यावर खेळत असताना ही दुर्दैवी घटना घडली
ओतूर : जुन्नर तालुक्यात ओतूर येथे ८ वर्षीय मुलगा सार्थक शिंदे मांडवी नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये पडून वाहून गेल्याची दुःखद घटना घडली आहे. या घटनेने ओतूरमध्ये सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
अधिक माहिती अशी की, ओतूर ता.जुन्नर येथील मांडवी नदी केटी बंधारा येथे मंगळवार दि. २२ ऑक्टोंबर रोजी ३.३० च्या सुमारास सानिका अमोल कोकाटे ही कपडे धुण्यासाठी गेली होती. यावेळी सार्थक गोरख शिंदे (वय ८) रा. ओतूर ता. जुन्नर जि. पुणे हा देखील मावशी बरोबर आला होता. सार्थक यावेळी तिथे असलेल्या मुला सोबत खेळत होता. काही वेळानंतर सायंकाळी ५. ३० दरम्यान सार्थक शिंदे हा दिसत नसल्याने त्याची मावशी सानिका कोकाटे यांनी शोधा शोध केली. तर सार्थक कुठे आढळून आला नाही. नंतर घरी फोन करून विचारले की सार्थक घरी आहे का? तर ते नाही म्हणाले. त्यानंतर सर्व जण बेपत्ता झालेल्या सार्थकचा शोध घेण्यासाठी नदीवर आले. त्याठिकाणी सार्थकची चप्पल नदीच्या काठावर आढळून आली. त्यावेळी नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याचा त्यांना संशय आला. यावेळी ग्रामस्थ, नातेवाईक यांनी शोधाशोध करत ओतूर पोलिसांना कळवले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूर पोलिसांनी व ग्रामस्थांनी मांडवी नदी प्रवाहात शोधा घेतला. दुसऱ्या दिवशी बुधवार दि. २३ ऑक्टोंबर रोजी सकाळी ८.३० च्या दरम्यान नगर कल्याण महामार्गाच्या पुलाच्या खाली मांडवी नदी पात्रात वाहत्या पाण्यात सार्थक शिंदेचा मृतदेह आढळून आला असल्याचे स्थानिकांनी सांगितले. या मुलाच्या मृत्यूमुळे त्याच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून यामुळे ओतूर व परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.