शारीरिक कसरती करताना पोलिस जवानाचा दुर्दैवी मृत्यू; गावावर पसरली शोककळा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 04:44 PM2022-02-04T16:44:12+5:302022-02-04T17:05:06+5:30
महेश हे पुण्यातील जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील डिकसळ या गावचे होते...
भिगवण (पुणे): ठाणे पोलीस शहर दलात कार्यरत असलेले महेश मच्छिंद्र मोरे वय (२७) या पोलिस कर्मचाऱ्याचे गुरुवारी (दि.३) रोजी पहाटे शारीरिक कसरतीसाठी गेले असताना निधन झाले. महेश मोरे हा युवक अथक व खडतर परिश्रम करून ठाणे शहर पोलीस दलात २०१४ साली दाखल झाला होता. ठाणे शहर पोलीस दलातील क्वीक रिस्पॉन्स टीममध्ये कमांडो म्हणून तो कार्यरत होता. महेश हे पुण्यातील जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील डिकसळ या गावचे होते. मोरे यांच्या जाण्यामुळे डिकसळ गावावर शोककळा पसरली आहे.
गुरुवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास महेश साकेत येथील पोलीस मैदानात शारीरिक कसरतीसाठी गेला असताना कसरती दरम्यान खाली कोसळला. तेथे उपस्थित असणाऱ्यांनी त्याला उपचारासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले. परंतु रुग्णालयामध्ये दाखल होण्यापूर्वी वाटेतच महेशचा मृत्यू झाला असल्याची माहिती ड्युटीवर उपस्थित असणाऱ्या डॉक्टरांनी दिली.
शवविच्छेदन केल्यानंतर मोरे यांच्या पार्थिवाला ठाणे शहर मुख्यालयात पोलीस आयुक्त जयवंत सिंह यांनी शासकीय इतमात मानवंदना दिली. गुरुवारी संध्याकाळी साडेनऊ वाजता महेश मोरे याच्या डिकसळ ( ता.इंदापुर जि.पुणे) येथे मुळ गावी पुणे ग्रामीणच्या पोलीस जवानांनी बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना देत शासकीय इतमामात पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने अंत्यविधीसाठी उपस्थित होते .