पुण्यातील संतापजनक घटना! मुलीला कुत्रा चावल्यामुळे काठीने बदडून कुत्र्यांच्या दोन पिलांना ठार मारले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 01:45 PM2022-04-12T13:45:56+5:302022-04-12T13:46:35+5:30
पोलिसांनी प्राण्यांना क्रुरतेने वागण्याच्या अधिनियमानुसार महिलेवर गुन्हा दाखल केला
पुणे : लहान मुलीला कुत्रा चावल्यामुळे संतप्त झालेल्या एका महिलेने काठीने बदडून सोसायटीतील कुत्र्याच्या दोन पिल्लांना ठार मारले. फुरसुंगीतील उच्चभ्रू अशा ग्रीन हाईव्ह सोसायटीत 9 एप्रिल च्या रात्री ही घटना घडली. याप्रकरणी नीता आनंद बीडलान (वय 43) या महिलेने तक्रार दिली असून अनिता दिलीप खाटपे (वय 45) या महिलेविरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी आणि आरोपी दोघेही फुरसुंगी येथील हरपळे वस्तीतील ग्रीन हाईव्ह सोसायटीत राहतात. घराच्या बाल्कनीतून पडलेली एक वस्तू आणण्यासाठी फिर्यादीचे लहान मुलगी खाली गेली होती. यावेळी ती वस्तू घेत असताना एक कुत्रा या लहान मुलाला चावला होता. याचा राग मनात धरून अनिता खाटपे सोसायटीतील कुत्र्याच्या लहान पिलांना लाकडी काठीने बदडले. यामध्ये दोन पिलांचा मृत्यू झाला.
दरम्यान सोसायटीतील एकाही कुत्र्याला जिवंत ठेवणार नाही असे म्हणून अनिता खाटपे या लाकडी काठी घेऊनच सोसायटीत फिरत होत्या आणि दिसेल त्या कुत्र्याला मारण्याचा प्रयत्न करत होत्या. दरम्यान पिलांचा पोस्टमॉर्टम झाल्यानंतर फिर्यादी यांनी हडपसर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी प्राण्यांना क्रुरतेने वागण्याच्या अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. हडपसर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.