पुण्यातील संतापजनक घटना! तरुणीने लग्नास नकार दिल्याने पाठ, गाल, दंडावर तरुणाने घेतला चावा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 11:05 AM2022-04-19T11:05:22+5:302022-04-19T11:05:35+5:30
तरुणावर विनयभंगासह इतर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले
येरवडा : "माझे तुझ्यावर प्रेम आहे, माझ्याशी लग्न कर" असे म्हणून चाकूचा धाक दाखवत बळजबरीने तरुणीला चावा घेऊन, हाताने मारहाण करीत गंभीर जखमी करणाऱ्या सराईत आरोपी विरुद्ध येरवडापोलिसांनी रविवारी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी निहाल विशाल भाट (वय 23,रा. भोसले वस्ती कंजारभाट येरवडा) याच्याविरुद्ध विनयभंगासह इतर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपी निहाल भाट याला येरवडा पोलिसांनी सोमवारी अटक केली.
येरवडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी ही शनिवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास तिच्या घरी असताना तिच्या ओळखीचा निहाल भाट हा हातात चाकू घेऊन आला."तू बाहेर ये, माझ्यासोबत चल, नाहीतर मी दरवाजा तोडून घरात घुसेल, मला कोणी अडवले तर त्याला मी जिवंत सोडणार नाही" अशी धमकी देत तो शिवीगाळ करत होता. त्याला समजावण्यासाठी तरुणी बाहेर आल्यावर बळजबरीने त्याने तिला चाकूचा धाक दाखवून मोटरसायकलवर बसून स्वतःच्या घरी घेऊन गेला. "माझे तुझ्यावर प्रेम आहे ,माझ्यासोबत लग्न कर" असे म्हणून हाताने तोंडावर मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याला विरोध केल्यानंतर त्याने मुलीच्या दंडावर ,पाठीवर, गालावर दाताने चावा घेऊन जखमी केले. तसेच हातातील चाकूने उजव्या पायाच्या नडगीवर तसेच गुडघ्यावर मारून गंभीर जखमी केले. गंभीर घटनेनंतर तरुणीने त्याच्या तावडीतून कशीबशी स्वतःची सुटका करून घेतली. शनिवारी रात्री खाजगी रुग्णालयात उपचार केल्यानंतर रविवारी येरवडा पोलीस स्टेशन येथे तिने सराईत गुन्हेगार निहाल भाट याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
याप्रकरणी रविवारी येरवडा पोलिसांनी निहाल विरुद्ध गुन्हे दाखल केले होते. या गंभीर घटनेनंतर तो फरार झाला होता. सोमवारी सकाळी तो त्याच्या घरी आल्याची खात्रीशीर माहिती पोलीस शिपाई श्रीनाथ कांबळे व अजित वाघुले यांना मिळाली होती. त्यानुसार तात्काळ त्याच्या घरी जाऊन त्याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. निहाल हा येरवडा पोलीस स्टेशन कडील सराईत आरोपी असून त्याच्यावर गंभीर मारहाणीचे तसेच इतर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. या गंभीर घटनेमुळे येरवड्यात पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती गाताडे करीत आहे .