बेळगावीमधील एका चार वर्षाच्या मुलाची औषधे पोहचविण्यासाठी मालगाडी आली धावून...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 07:42 PM2020-04-16T19:42:39+5:302020-04-16T19:43:14+5:30
मुलाच्या पुण्यातील काकाने पोलिसांकडे औषधे घेऊन जाण्याची परवानगी मागितली. पण दोनदा ही परवानगी नाकारण्यात आली
पुणे : बेळगावीमधील एका चार वर्षाच्या मुलाची होमिओपॅथिक औषधे संपली होती. या औषधांमुळे त्याचा अन्न गिळण्याचा त्रास कमी झाला होता. पण लॉकडाऊनमुळे पुण्यात येणे शक्य नव्हते. मुलाच्या पुण्यातील काकाने पोलिसांकडे औषधे घेऊन जाण्याची परवानगी मागितली. पण दोनदा ही परवानगी नाकारण्यात आली. अखेर या मुलाच्या मदतीसाठी रेल्वे धावून आली. अधिकाऱ्यांनी मुलाला औषधांची गरज ओळखून नकारघंटा न वाजविता एका मालगाडीतून ही औषधे बेळगावीला पोहचविली.
बेळगावी येथील टिळकवाडीमध्ये एका चार वर्षाच्या मुलाला लहानपणापासूनच अन्न गिळण्याचा त्रास आहे. अन्ननलिकेचा आकार छोटा असल्याने त्याला व्यवस्थितपणे अन्न गिळता येत नाही. त्यावर उपाय म्हणून मागील दीड वर्षांपासून ते पुण्यातील डॉक्टरांकडून होमिऔपॅथिक औषधे घेत आहेत. त्यानंतर त्याचा अन्न गिळतानाचा त्रास कमी होऊ लागला. मुलाचे काका कधी पुण्यातून कुरिअरने औषधे पाठवत असत. तर कधी त्याचे वडील पुण्यात यायचे. पण लॉकडाऊनमुळे सर्वच ठप्प झाले. मुलाची औषधे संपल्याने पालकही चिंतेत होते. मुलाच्या काकांनी डॉक्टरांकडून औषधे घेतली पण ती पाठविणार कशी हा प्रश्न निर्माण झाला. पोलिसांकडे बेळगावीला औषधे नेण्याची परवानगी मागितली. पण दोनवेळा ही परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे सर्वजण हतबल झाले होते. यामध्ये दहा दिवस उलटून गेले. अखेर मुलाच्या वडिलांच्या बेळगावी येथील मित्राने तेथील रेल्वे अधिकाºयांना याबाबत सांगितले. त्यांनी तातडीने पुण्यातील रेल्वे अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. मुलाच्या काकानेही अधिकाºयांना भेटत स्थितीचे गांभीर्य समजावून सांगितले.
पुणे रेल्वेचे संचलन व्यवस्थापक मयंक राणा व वाणिज्य व्यवस्थापक अजय कुमार यांनी मदतीचे आश्वासन दिले. तसेच बेळगावीला जाणाºया मालगाडीच्या गार्डकडे मुलाची औषधे सोपविली. ही औषधे बेळगावीमध्ये पोहचली. पण लॉकडाऊनमुळे पालकांनी तिथपर्यंत येणेही शक्य नव्हते. मग त्यांच्या घराजवळ राहणाऱ्या रेल्वेच्याच एका कर्मचाऱ्याने ही औषधे देण्यात आली. पालकांनी त्यांच्याकडून ही औषधे घेत रेल्वेचे आभार मानल्याची माहिती रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी दिली.
-----------
सध्या कोरोना हा एकमेव आजार नाही. इतरही आजारांचा सामना करावा लागत आहे. अनेकांना अशा अडचणी येत आहेत. प्रशासनाने त्या समजून घ्यायला हव्यात. अशा परस्थितीत रेल्वे अधिकाऱ्यांनी मदत केल्याने मुलाला औषधे मिळू शकली. आता दोन महिने काही अडचण नाही, अशी भावना मुलाच्या पालकांनी व्यक्त केली.