रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! कोरोनामुळे बंद असलेल्या 'या' ट्रेन पुन्हा ट्रॅकवर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2022 12:24 PM2022-01-15T12:24:36+5:302022-01-15T12:46:03+5:30
गेल्या अनेक दिवसांपासून प्रगती एक्स्प्रेस सुरू करावी अशी मागणी प्रवासी करीत होते...
पुणे : मध्य रेल्वे प्रशासनाने कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी बंद केलेल्या रेल्वे गाड्या पुन्हा सुरू करीत आहे. यात पुणे - मुंबई दरम्यान धावणारी प्रगती एक्स्प्रेस, सह पुणे - भुसावळ एक्स्प्रेसचा समावेश आहे. ही गाडी व्हाया नाशिक मार्गे धावत असल्याने पुण्याहून नाशिकला जाणाऱ्या प्रवाशांची २ सोय होणार आहे. ह्या दोन्ही गाड्या जवळपास २२ महिन्यानंतर आता पुन्हा ट्रॅकवर येणार आहेत. १९ जानेवारीपासून ह्या गाड्या धावण्याची शक्यता आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून प्रगती एक्स्प्रेस सुरू करावी अशी मागणी प्रवासी करीत होते. ती आता पूर्ण होत आहे. पुण्याहून सकाळी ७ वाजून ४० मिनिटांनी मुंबईला जाणारी गाडीला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभतो. मध्य रेल्वेच्या मुख्यालयाकडून पुणे व सोलापूर विभागाला रेक तयार ठेवण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार दोन्ही विभागाने त्याप्रमाणे रेक तयार करून ठेवला आहे. १९ जानेवारीपासून प्रगती एक्स्प्रेस सुरू होण्याची शक्यता रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.
पुणे - भुसावळसाठी हुतात्माचा रेक :
पुण्याहून भुसावळला जाणाऱ्या गाडीसाठी सोलापूर - पुणे धावणाऱ्या हुतात्मा एक्स्प्रेसचा रेक वापरला जातो. त्यामुळे तशा सूचना सोलापूर विभागाला देण्यात आले आहे. हुतात्मा व भुसावळ एक्स्प्रेस साठी दोन रेक आवश्यक असतात. ते रेक तयार करून झाले आहे.
सोलापूर - मिरज एक्स्प्रेस कोल्हापूरहून धावणार
सोलापूर - मिरज एक्स्प्रेसला प्रतिसाद नसल्याने ह्या गाडीचे विस्तारीकरण केले जाणार आहे. ही गाडी आता पुणे विभागातील कोल्हापूर स्थानकावरून सुटेल मिरज, कुर्डुवाडी, सोलापूर मार्गे कलबुर्गी (गुलबर्गा ) पोहचेल. ही गाडी देखील लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार आहे.