एक रेल्वे अशीही धावली २८ तास उशिरा; क्षमता २५०० प्रवाशांची, बसले ८० प्रवासी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2017 04:18 AM2017-11-05T04:18:32+5:302017-11-05T04:18:48+5:30
दिवाळीच्या सुट्टीत प्रवाशांच्या विशेष सोयीसाठी सुरू केलेली पुणे गोरखपूर अनारक्षित (जनरल) विशेष गाडी रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे सुमारे २८ तासांपेक्षाही जास्त उशिराने पुण्यात पोचली.
- सचिन सिंह
वारजे : दिवाळीच्या सुट्टीत प्रवाशांच्या विशेष सोयीसाठी सुरू केलेली पुणे गोरखपूर अनारक्षित (जनरल) विशेष गाडी रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे सुमारे २८ तासांपेक्षाही जास्त उशिराने पुण्यात पोचली.
या गाडीवर नाव दर्शविणारी
पाटीही नसल्याने अगदीच नगण्य प्रवासी घेऊन जवळ जवळ मोकळीच धावत आहे.
रेल्वे प्रशासनाने जारी केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे गाडी क्र . ०१४५४ गोरखपूरहून पुण्यात बुधवारी संध्याकाळी पाच वाजता येणे अपेक्षित होते, पण ही गाडी गुरुवारी रात्री साडेनऊ वाजता पुण्यात आली. म्हणजे सुमारे २८ तासांपेक्षाही जास्त उशिराने धावली आहे.
अशाच प्रकारे पुण्यातून या गाडीची (०१४५३) सुटण्याची वेळ दर रविवारी संध्याकाळी ७.५० वाजता आहे. तरीही पुण्यातून सुटताना या गाडीला मागील दोन रविवारी अनुक्रमे साडेपाच तास (म्हणजेच सोमवारी मध्यरात्री १.२० वा.) व साडेसात तास (पहाटे ३.२०) असा उशीर झाला होता. यात गमतीचा भाग असा, की ही गाडी विशेष गाडी असल्याने पुणे अथवा गोरखपूरहून उशिरा सुटली तरी मधल्या प्रवासात तिचा वेग वाढवून किंवा थांब्यावर कमी वेळ थांबा
घेऊन वेळेची बचत करता येणे शक्य आहे. पण प्रशासन नेमकी उलट भूमिका घेऊन मधल्या टप्प्यात गाडीस अजूनच उशीर करत आहे. काही महत्त्वाच्या स्थानकांमध्ये ही गाडी तास-दोन तास थांबवून ठेवण्यात येऊन इतर गाड्या पुढे सोडण्यात येऊन ही हॉलिडे स्पेशल असल्याने सापत्न वागणूक मिळत असल्याचे प्रवाशांची भावना आहे.
गाडीला नाही नावाची पाटी
प्रत्येक रेल्वेगाडीला नाव व गाडी क्रमांक दर्शवणारी पाटी असते. पण या गाडीला अशी कोणतीच पाटी नव्हती, अशी माहिती या गाडीने प्रवास करणारे सुभाष गौड यांनी दिली. त्यामुळे पुणे गोरखपूर दरम्यान दौंड, मनमाड , भुसावळ या महाराष्ट्रातील शहरांबरोबरच परराज्यांतील खंडवा, इटारसी, भोपाळ, झाशी अशा मधल्या स्थानकांवरील स्थानिक प्रवासीदेखील या गाडीत चढत नाहीत. कारण गाडीत जागा असली तरी गाडी कुठून कुठे जाते हेच प्रवाशांना माहीत नसते. या गाडीची वेळ अनेकदा चौकशी खिडकीवरील कर्मचाºयांनादेखील माहीत नसते. अशा वेळेस रेल्वेच्या नॅशनल ट्रेन इन्क्वायरी सिस्टम या वेबसाइटला भेट दिल्यास एखादी गाडी सध्या कुठे आहे याची इत्थंभूत माहिती मिळू शकते. पण फक्त स्मार्टफोन असणारे किंवा सुशिक्षित नागरीकच याचा वापर करतात. त्यांनाही याची फारशी माहिती नसल्याचे समोर आले आहे.
साधारण पणे रेल्वेच्या सामान्य डब्यात कमी उत्पन्न असणारे नागरिक प्रवास करतात. डिजिटलायजेशन संकल्पनेशी फारसा संबंध येत नाहीत. त्यामुळे वेबसाईटवर रेल्वेचे माग काढून व उशिरा धावणारी रेल्वे पकडणे हे त्यांना शक्यच नाही. त्यामुळे साधारण (जनरल) तिकीट कोणत्याही गाडीत चालत असल्याने ते या मार्गावर धावणाºया अन्य गाड्यांत प्रवास करतात. परिणामी सिझनमध्ये रेग्युलर गाड्यांना प्रचंड गर्दी व अशा विशेष गाड्या मोकळ्या असे चित्र निर्माण होत आहे. गाडीत पूर्ण क्षमतेने प्रवासी बसल्यास २००० प्रवासी सहज प्रवास करू शकतात. पुण्यात गुरुवारी संध्याकाळी आलेल्या गाडीत फक्त ८० च्या आसपास प्रवासी होते.
पुणे वाराणसीलाही उशीर - गोरखपूरहून आल्यावर हीच गाडी वाराणसी स्पेशल म्हणून गुरुवारी रात्री दहा वाजता सोडण्यात येते. म्हणजेच गोरखपूर गाडीचेच रेक (डबे) पुणे मंडूवाडीह (वाराणसी) सर्वसाधारण विशेष गाडी म्हणून धावते, गुरुवारी रात्री साडेनऊला आल्यावर तिला रात्री १० वाजता लगेच सोडणे शक्य नव्हते. कारण गाडी बाहेरगावाहून पुण्यात आल्यावर तिची साफसफाई व सुरक्षाविषयक इतर तपासण्या करायला काही ठराविक वेळ द्यावा लागतो. त्यामुळे पुणे वाराणसी गाडीने (क्र. ०१४०३) तब्बल आठ तास उशिराने म्हणजेच शुक्रवारी सकाळी ६ वाजता पुण्याहून वाराणसीकडे प्रयाण केले. ही गाडीही वाराणसीला उशिरानेच पोहोचेल व परत परतीचा प्रवास उशिरानेच सुरू करून पुण्यात साधारण १५ ते २० तास उशिरा येण्याची शक्यता आहे.
अधिकाºयांचेही दुर्लक्ष : विशेष म्हणजे रेल्वेचे अनेक अधिकारी, कर्मचारीही अशा गाड्यांनी आसपासच्या स्थानकात प्रवास करत असतात. त्यांनाही याबाबत काहीच माहिती नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मागच्या आठवड्यात आपणही अशाच गाडीने पुणे ते दौंड प्रवास केल्याचे रेल्वेचे अधिकारी मनोज झंवर यांनी ‘लोकमत’शी बोलताना मान्य केले. रात्रीचा अंधार असल्याने आपण पाटीकडे फारसे लक्ष दिले नाही. आपल्याच डब्याला पाटी नसेल. पुढे इंजिनजवळ व मागे गार्डजवळ असेल असे त्यांना त्या वेळेस वाटले, असे ते म्हणाले व याबाबत निश्चित उपाययोजना करण्यात येणार असल्याचे त्यांनी मान्य केले.
पुणे गोरखपूर गाडी क्र. ०१४५३ ५४ एक्स्प्रेस व १४०३-०४ पुणे - वाराणसी एक्स्प्रेस ही गाडी रेल्वेच्या सुमारे आठ दहा विभागातून जाते. त्यामुळे रेल्वेस उशीर होत असावा. गाडीस उशीर होत असल्याबद्दल रेल्वेच्या परिचालन विभागास माहिती कळवण्यात येईल. गाडीवर पाट्या नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. हे मान्य असून त्याबाबत लवकरच विभागास कळवून नव्याने पाटी बसवण्याची प्रक्रिया करण्यात येईल.
- मनोज झंवर,
मुख्य जनसंपर्क
अधिकारी, पुणे विभाग